मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांत वावरणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यामुळे आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्यांची उकल करणे सुरक्षा व्यवस्थेला अधिक सोपे झाले आहे. पश्चिम रेल्वेवर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये १२० गुन्ह्यांची उकल करून आरोपींना पकडण्यात आले आहे.
प्रवासी आणि त्याच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेचे रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) जवानांना तैनात केले आहे. प्रवाशांचे साहित्य चोरीला जाण्याच्या घटना रोखण्यासाठी आरपीएफतर्फे विशेष ‘प्रवासी सुरक्षा’ मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत सीसी टीव्ही कॅमेऱ्याची मोठी मदत होत आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यात बंदिस्त झालेल्या चित्रणाचा आधार घेत आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये १२० गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यश आले आहे.
हेही वाचा >>> ऑनलाईन पैसे पाठवल्याचा संदेश दाखवून बकऱ्याची चोरी, देवनारमधील विक्रेत्यांची फसवणूक करणारा आरोपी अटकेत
नुकताच कांदिवली स्थानकावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण पाहताना एका व्यक्तीच्या हालचाली संशंयास्पद असल्याचे लक्षात आले. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव सुरेश प्रजापती (२६) असल्याचे सांगितले. अधिक तपास केला असता, प्रजापती सात गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले. बोरिवली, कांदिवली, दहिसर या स्थानकांत चोरी करून आरोपींने एकूण १.३८ लाख रुपये किमतीचे मोबाइल लंपास केल्याचे समोर आले. या आरोपीला बोरिवली रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आले असून त्याच्यावर चोरीचे सात गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
पश्चिम रेल्वेवरील स्थानकांमध्ये रशियन बनावटीचे सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रशियन बनावटीच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे गर्दीच्या ठिकाणी एकाच वेळी ५० प्रवाशांची ओळख पटविणे शक्य होते. या कॅमेऱ्यांमुळे आरोपींना ओळखण्यासाठी आणि हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मदत होत आहे. पश्चिम रेल्वेमध्ये ३,८०२ सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यापैकी ४८८ कॅमेरे हे फेशियल रेकग्निशन सिस्टमने (एफआरएस) सुसज्ज आहेत. रेल्वे परिसरातील गुन्हे रोखण्यासाठी आरोपींचा तपशील छायाचित्रासह यंत्रणेत अपलोट केला जातो.