मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकल डब्यात अनधिकृतपणे बाबा-बुवांच्या जाहिराती लावण्याचे प्रकार सुरू होते. या जाहिरातीतून प्रवाशांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात येत होती. अंधश्रद्धेला खतपाणी देणाऱ्या या जाहिरातींना आळा घालण्यासाठी, पश्चिम रेल्वेने आरपीएफचे पथक तयार केले होते. या पथकाद्वारे जाहिराती लावणाऱ्या टोळीच्या कथित मुख्य सुत्रधारासह त्याच्या साथीदारांना पकडण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून जाहिरातींची ४२ हजार अनधिकृत पत्रके जप्त केली आहेत.
पश्चिम रेल्वेच्या लोकल डब्यात उद्घोषणेद्वारे, डिस्प्लेद्वारे आणि लोकल डब्यामध्ये खिडकीच्या जवळील भागात अधिकृतपणे जाहिरात केली जाते. या जाहिरातींतून रेल्वेला महसूल मिळतो. लोकल डब्यात अथवा रेल्वे परिसरात कोणत्याही प्रकारची जाहिरात, फलक लावण्यापूर्वी त्याबाबत परवानगी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून घ्यावी लागते. तसेच जाहिरातीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क भरावे लागते. परंतु, कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे अंधश्रद्धा पसरविणाऱ्या बाबा, बुवांच्या जाहिरातींची पत्रके डब्यात चिकटवली जातात. तसेच या जाहिरातींच्या आहारी जाऊन, अनेक नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार घडले आहेत.
पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे याबाबात अनेक तक्रार आल्या होत्या. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी विशेष पथक स्थापन केले होते. नुकताच या विशेष पथकाला बाबा-बुवाच्या जाहिराती लावणाऱ्या टोळीची माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे, उपनिरीक्षक संतोष सोनी, सहाय्यक उपनिरीक्षक विवेकानंद माळी, हवालदार रवींद्र गायकर, पुष्पेंद्र, प्रियदर्शन, अर्जुन सिंग, हेमंत आणि प्रदीप फौजदार यांनी काशीमिरा येथील लक्ष्मीनगर येथून पत्रके लावणाऱ्या टोळीचा कथित मुख्य सूत्रधार बाबा रियाज चौधरी उर्फ अक्रम बाबा, सलीम बाबा उर्फ सल्लू, इर्शाद चौहान, मोहम्मद शोहेब आणि मोहम्मद शाकीर यांना पकडले. जप्तीच्या पंचनाम्याद्वारे एकूण ४२ हजार पोस्टर जप्त करण्यात आले. पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी आरपीएफच्या भाईंदर ठाण्याला सुपूर्द करण्यात आले.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल डब्यात अंधश्रध्दा वाढवणाऱ्या जाहिराती लावण्याचे प्रकार सुरू आहेत. यावर अनेकवेळा कारवाई करण्यात येते. परंतु, वारंवार बाबा-बुवांच्या जाहिराती लावण्याचे प्रकार घडत आहेत. रात्रीच्या वेळी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या कारशेडमध्ये जाऊन लोकल डब्यात भोंदूबाबांच्या जाहिराती लावण्याचे काम केले जाते. त्यानंतर सकाळी लोकलमध्ये या जाहिराती सर्वत्र दिसतात. अनेकदा धावत्या लोकलमध्ये देखील बाबा-बुवांच्या जाहिराती लावण्याच्या घटना घडल्या आहेत. लोकल महिला डब्यात तरुण मुले शिरून, त्यांच्याद्वारे जाहिरातील लावण्याचे प्रकार घडले आहेत.

