मुंबई : पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) के ९ पथकातील ४३ प्रशिक्षित श्वान रेल्वे सुरक्षेची महत्त्वाची फळी ठरत आहेत. स्फोटके, अमली पदार्थ, ज्वलनशील वस्तू शोधणे व संशयितांचा माग काढणे व रेल्वेसंबंधित गुन्ह्यांच्या तपासात हे श्वान आरपीएफ कर्मचाऱ्यांना सक्रिय मदत करत आहेत.

सध्या पश्चिम रेल्वेवर कार्यरत असलेल्या ४३ श्वानांपैकी १९ स्फोटक शोधण्यासाठी, ६ अमली पदार्थ शोधण्यासाठी, १७ ट्रॅकर श्वान; तर एक वन्यजीवांच्या वासाचा शोध घेण्यासाठी प्रशिक्षित आहे.

२०२३ ते २०२५ या कालावधीत पश्चिम रेल्वेने १९ नव्या श्वानांचा समावेश केला आहे. त्यात २०२३ मध्ये दोन, २०२४ मध्ये १५ व २०२५ मध्ये दोन श्वानांची भर पडली. या ताफ्यात बेल्जियन शेफर्ड, जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर, डॉबरमन व लॅब्राडोर रिट्रिव्हर जातींचा समावेश आहे. या नव्या श्वानांपैकी ७ स्फोटक शोधण्यासाठी, ४ अमली पदार्थ शोधण्यासाठी, ७ ट्रॅकर व एक वन्यजीव शोधण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आला आहे.

आठ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण

प्रत्येक श्वानाला सुमारे आठ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. पुण्यातील आरपीएफ के ९ केंद्र, दिल्लीतील दयाबस्ती, पोदानूर (दक्षिण रेल्वे) व हरियाणातील आयटीबीपी प्रशिक्षण केंद्र अशा मान्यताप्राप्त संस्थांमध्ये हे प्रशिक्षण दिले जाते.

मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, रतलाम, भावनगर व राजकोट विभागांमध्ये हे श्वान तैनात आहेत. श्वानांसोबत त्यांचे प्रशिक्षकांनाही (हँडलर) विशेष प्रशिक्षण दिले जाते. अहमदाबाद विभागातील एएसआय प्रकाश चंद्र यांनी व्हेटरनरी, इन्स्ट्रक्टर व हँडलर कोर्स पूर्ण करून के ९ स्क्वॉडची क्षमता अधिक बळकट केली आहे.

गाजलेल्या कारवाया

पश्चिम रेल्वेने जानेवारी ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत के ९ पथकाच्या अनेक उल्लेखनीय कारवायांची नोंद केली आहे.

४ जानेवारी – मध्य प्रदेशमधील इंदूरजवळ सिग्नल केबल चोरी प्रकरणात ट्रॅकर श्वान ट्रिमो ने ८०० मीटरपर्यंत माग काढत चोरीचा माल व हत्यारे शोधून काढले. दोन आरोपींना अटक झाली.

१७ जानेवारी – इंदूर – देवास दरम्यान अँटी-सॅबोटेज तपासणीवेळी प्रवाशाकडे भरलेला एलपीजी सिलिंडर आणि गॅस स्टोव्ह असल्याचे श्वानाने शोधून काढले.

१० फेब्रुवारी – राजकोट येथे उशर या ट्रॅकर श्वानाने चोरीचे ४९२ लिटर डिझेल लपवलेली जागा शोधून काढली. सुमारे ४४ हजार रुपयांचे डिझेल जप्त करून चार आरोपींना अटक करण्यात आली.

२१ फेब्रुवारी – वांद्रे टर्मिनसवरील अवध एक्सप्रेसमध्ये टँगो या नार्को श्वानाने बेवारस बॅगेत १३.८३४ किलो चरस असल्याचे शोधले. त्याची किंमत सुमारे १३.८३ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

२६ मे – वांध – भचाऊ दरम्यान सिग्नल केबल चोरी प्रकरणात लिओने दोन संशयितांपर्यंत पोहोचून चोरीचा माल हस्तगत करण्यात मदत केली.

४ ऑगस्ट – डेरोल स्थानकावर झिको या श्वानाने प्रवाशाच्या सामानातील ५ किलोचा भरलेला एलपीजी सिलिंडर शोधून काढला.


– स्फोटक शोधणारे श्वान – १९

– नार्कोटिक्स श्वान – ६ – माग काढणारे श्वान – १७

– वन्यजीव शोधणारे श्वान – १ – एकूण श्वान – ४३