मुंबई : प्रवाशांनी मेट्रो, पर्यायी वाहनांतून प्रवास करण्यास प्राधान्य दिल्याने, पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या संख्येत ५.३५ लाखांची घट झाली आहे. करोना काळापूर्वी पश्चिम रेल्वेतून सरासरी ३४.८७ लाख प्रवासी प्रवास करीत होते. तर, सध्या सरासरी २९.५२ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. करोनानंतर प्रवासी संख्या स्थिर असल्याची नोंद आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी पश्चिम रेल्वेद्वारे मुंबई सेंट्रल येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह व वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सिंह म्हणाले की, करोनानंतर प्रवासी संख्या स्थिर आहे. प्रवासी मेट्रो किंवा इतर पर्यायी वाहनांकडे वळले आहेत.

प्रवासी संख्या विभाजित झाल्याने रेल्वेवरील ताण कमी होईल. प्रवासी संख्या कमी झाली असली तरी, महसुलात वाढ झाली आहे. करोनापूर्वी प्रवासी महसुलातून सरासरी २.१२ कोटी महसूल मिळत होता. तर, करोनानंतर प्रवासी महसुलातून सरासरी २.३९ कोटी रुपये महसूल मिळत आहे.

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची वाढ करण्यात येणार आहे. सध्या १५ डब्यांच्या २११ लोकल फेऱ्या धावत असून यात १६ लोकल फेऱ्यांची वाढ केली जाईल. तसेच अंधेरी – वांद्रे धीम्या मार्गावर १५ डबा लोकल धावत नाही. त्यामुळे विलेपार्ले, सांताक्रूझ फलाटांची लांबी वाढवण्यात येत आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरही प्रवाशांना १५ डबा लोकलची सेवा मिळेल. एका १५ डबा लोकलमुळे ३३ टक्के प्रवाशांची क्षमता वाढते. तर, सर्व १५ डबा लोकल फेऱ्यांमुळे ४५ हजार प्रवाशांची अतिरिक्त वहन क्षमता वाढते. यामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना दिलासा मिळेल, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.

पश्चिम रेल्वेवरील ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी लोकलचा मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी खुला केला आहे. मालडब्यात अत्यावश्यक बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी डबा तयार केला आहे. १०५ रेकपैकी २७ रेकमध्ये अद्ययावत डबे तयार केले आहेत.

पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वे यांना थेट जोडणाऱ्या नायगाव – जुचंद्र कॉर्ड लाईनचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेकडून पुढे आणण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास कोकणातील काही रेल्वेगाड्या पश्चिम रेल्वे मार्गावरून चालविणे शक्य होईल. विरार – नागदादरम्यान कवच प्रणाली अद्ययावत केली आहे. तसेच वारंवार होणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी अग्निसुरक्षा वाढविण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरील ४९४ स्टाॅलपैकी ३०० हून अधिक स्टाॅलचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण झाले आहे.