मुंबई : पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर वाढणारी प्रवाशांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आता विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत. गर्दीच्या प्रमुख स्थानकांवर प्रत्येकी २० जणांचे पथक तैनात करण्यात येणार असून, प्रवाशांची सुरक्षितता आणि गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारी या पथकावर असणार आहे.
मुंबईतील गर्दीच्या स्थानकांवर सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. फलाट, पादचारी पूल, जिने आणि तिकीट खिडक्यांजवळ गर्दी वाढल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे विशेष पथकांची मदत घेणार आहे. या पथकातील कर्मचारी गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवतील. प्रवाशांची गर्दी एका ठिकाणी वाढू नये, यासाठी आवश्यकतेनुसार त्यांना दुसऱ्या मार्गाने वळवणे, फलाटावर शिस्त राखणे; तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत करणे, अशी कामे केली जाणार आहेत.
विशेषतः गर्दीच्या स्थानकांवर लोकल आल्यानंतर आणि सुटल्यानंतर होणारी गर्दी नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे फलाटावर होणारी धावपळ कमी होऊन प्रवाशांची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या दादर, अंधेरी, सांताक्रूझ, बोरिवली, विरार, नालासोपारासारख्या गर्दीच्या स्थानकांसह इतर कमी गर्दीच्या स्थानकांत कर्मचारी तैनात केले जातील. परंतु, स्थानकांतील गर्दीच्या तुलनेत कर्मचारी नेमण्यात येतील. वातानुकूलित लोकलचे स्वयंचलित दरवाजे वेळेवर बंद व्हावेत, यासाठीही कर्मचारी तैनात केले जातील. कारण या सेवांमधील अति-गर्दीमुळे उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकल उशिरा धावण्याच्या समस्येत भर पडत आहे. गर्दीच्या वेळी वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांची हालचाल संथ होते. प्रवासी दरवाजाजवळ गर्दी करतात, ज्यामुळे गाड्यांना नियोजित वेळेपेक्षा जास्त काळ फलाटावर थांबावे लागते. या अतिरिक्त थांब्यामुळे गाड्यांच्या वेळेचे पालन करण्यावर परिणाम होतो आणि त्यानंतरच्या सेवांनाही उशीर होतो.
पश्चिम रेल्वेवरील बहुतांश सेवांना विविध कारणांमुळे उशीर होतो. त्यात प्रामुख्याने वातानुकूलित लोकलचे स्वयंचलित दरवाजे उघड – बंद होण्यास अतिरिक्त वेळ लागतो. मोठ्या प्रमाणात गर्दी असताना अनेकदा दरवाजे वेळेवर बंद होऊ शकत नाहीत. त्यामुळे संपूर्ण मार्गावरील गाड्यांवर परिणाम होतो. दरवाजे वेळेवर बंद व्हावेत आणि प्रवाशांनी जलद हालचाल करावी. यासाठी अत्यंत गर्दीच्या स्थानकांवर कर्मचारी तैनात केले जातील. प्रत्येक स्थानकावर वाचवलेल्या काही सेकंदांमुळे संपूर्ण मार्गावरील गाड्या वेळेवर धावण्यास मदत होऊ शकते, असे एका पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच विशेष कर्मचारी नेमल्यास, सुरक्षा विभागावरील ताण कमी होईल.
हे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करणार असून, प्रत्येक गर्दीच्या स्थानकात २० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी तैनात केले जातील. तर, कमी गर्दीच्या स्थानकात सुमारे १० कर्मचारी नेमले जातील. विभागीय स्तरावर याला परवानगी मिळाली असून, पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
