मुंबई : पश्चिम रेल्वेने एप्रिल ते ऑगस्टदरम्यान राबविलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत १३.४७ लाख विनातिकीट व अनियमित प्रवाशांची धरपकड केली असून, त्यांच्याकडून १००.४२ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे, वातानुकूलित लोकलमधील कारवाईत दंड वसुलीत तब्बल १७२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.
मुंबई लोकल, मेल-एक्स्प्रेस, प्रवासी गाड्या आणि विशेष रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी तिकीट तपासणी पथकांनी व्यापक मोहीम राबवली. ऑगस्टमध्ये २.१३ लाखांहून अधिक विनातिकीट आणि अनियमित प्रवासी सापडले. त्यांच्याकडून १७.१६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मुंबई उपनगरीय विभागात एप्रिल ते ऑगस्टदरम्यान ४.६५ लाख विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची प्रकरणे नोंदविण्यात आली. या कारवाईतून २५.६५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.
सर्वसाधारण तिकीट घेऊन वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांविरोधातही पश्चिम रेल्वेने विशेष मोहीम सुरू ठेवली आहे. पाच महिन्यांत ७८ हजार ६०० दंडात्मक प्रकरणे नोंदवून ३.२६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीत ३६ हजार ४८० प्रकरणांतून १.२० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. यावर्षी दंड वसुलीत सुमारे १७२ टक्के वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वेने महसूल संरक्षण, अधिकृत तिकीट घेऊन प्रवास करण्यास प्रोत्साहन आणि प्रवाशांमध्ये प्रवास शिस्त निर्माण करण्यासाठी अशा तिकीट तपासणी मोहिमा पुढेही अधिक तीव्रतेने राबविण्यात येतील, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.
पश्चिम रेल्वेवरून दररोज १,४१४ लोकल फेऱ्या आणि १४७ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात. या लोकलमधील गर्दीचा फायदा घेऊन अनेक विनातिकीट प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करतात. अशा प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.
विनातिकीट प्रवासी शोधण्यासाठी बहुआयामी धोरण अवलंबले आहे. ज्यामध्ये स्थानक तपासणी, सापळा तपासणी, अचानक धाड तपासणी (ॲम्बुश तपासणी), तटबंदी तपासणी (फोर्ट्रेस चेक), व्यापक तपासणी आणि मेगा तिकीट तपासणी मोहिमा यांचा समावेश आहे. ही कार्यवाही सर्व विभागांमध्ये मेल / एक्स्प्रेस, विशेष रेल्वेगाड्या तसेच मुंबई विभागातील उपनगरी गाड्यांमध्ये केली जाते, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.
