मुंबई : विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने एप्रिल – जून २०२६ या कालावधीत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली. यात मोहिमेत सुमारे ९.५० लाख विनातिकीट व अनियमित प्रवासी; तसेच विनाआरक्षित सामानाची प्रकरणे आढळून आली. या कारवाईतून सुमारे ६९ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत महसुलात १७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

करोना काळानंतर पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या स्थिर आहे. करोना काळापूर्वी पश्चिम रेल्वेवर सरासरी ३४.८७ लाख प्रवासी प्रवास करीत होते.सध्या सरासरी ३० लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. प्रवाशांची गर्दी कमी झाली असली तरी, विनातिकीट प्रवासी प्रवास करीत आहेत. विनातिकीट प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वेचा बुडणारा महसूल मिळवणे, प्रवासात शिस्त वाढवणे, तिकीटधारक प्रवाशांना सुविधा पुरवण्यासाठी आणि त्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

जून २०२६ या एका महिन्यातच २.६५ लाख विनातिकीट व अनियमित प्रवासी आढळले असून त्यांच्याकडून सुमारे १८.५० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. दंडापोटी जून २०२५ मध्ये वसूल करण्यात आलेल्या १५.२४ कोटींच्या तुलनेत यात २१.३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई उपनगरी विभागात एप्रिल – जून २०२६ दरम्यान ३.१४ लाख विनातिकीट व अनियमित प्रवासाची प्रकरणे आढळली. या कारवाईतून सुमारे १६.५० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.

गेल्या वर्षी याच कालावधीत १५.९० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. वातानुकूलित लोकलमध्ये सामान्य तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांवरही विशेष कारवाई करण्यात आली. या कालावधीत ४९,५५० दंडात्मक प्रकरणे नोंदवून १.६३ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षीच्या ६२.७६ लाख रुपयांच्या दंड वसुलीच्या तुलनेत यात सुमारे १६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबई उपनगरी, वरिष्ठ वाणिज्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मेल – एक्स्प्रेस, प्रवासी तसेच विशेष गाड्यांमध्ये व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. तसेच विनातिकीट प्रवाशांचा शोध घेण्यासाठी बहुआयामी धोरण अवलंबले आहे. ज्यामध्ये स्थानक तपासणी, सापळा तपासणी, अचानक धाड तपासणी (ॲम्बुश तपासणी), तटबंदी तपासणी (फोर्ट्रेस चेक), व्यापक तपासणी आणि मेगा तिकीट तपासणी मोहिमा यांचा समावेश आहे. महसुलाची गळती रोखणे, विनातिकीट प्रवासाला आळा घालणे आणि नियमित प्रवाशांना त्रासमुक्त प्रवास उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.