मुंबई : विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने राबविलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत एप्रिल ते जुलै २०२६ या कालावधीत ११.३० लाख प्रवाशांवर कारवाई केली. या कारवाईत ८३.२५ कोटींचा दंड वसूल करण्यात आला.जुलैमध्ये १.८० लाख विनातिकीट व अनियमित प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १४.५० कोटींचा दंड वसूल करण्यात आला.
मुंबई उपनगरी रेल्वेगाड्या, लांब पल्ल्याच्या गाड्या एक्स्प्रेस तसेच विशेष रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी मोहीम राबविण्यात आली. वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांमधून साधारण रेल्वेगाडीच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. एप्रिल ते जुलै या कालावधीत ६४ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. यात दोन कोटी ४५ लाख रुपयांची दंडवसुली झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदा दंडवसुलीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १६२ टक्क्यांची वाढ झाली. गेल्या वर्षी ९३.४० लाख दंड वसूल करण्यात आला होता.
बनावट तिकीट मुंबई सेंट्रल विभागातील मुख्य वाणिज्य तिकीट तपासनीस अरविंद सिंह यांना वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांमधील तपासणीदरम्यान एका प्रवाशाकडे बनावट यूटीएस मोबाइल ॲपद्वारे तयार केलेले बनावट यूटीएस तिकीट आढळून आणले. संबंधित प्रवाशाने यूट्यूबवरील लिंकद्वारे हे बनावट ॲप डाउनलोड केल्याचे चौकशीत उघड झाले. या प्रकरणी मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना अशा बनावट ॲपपासून सावध राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ रेल्वे अधिकारी वा रेल्वे पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच महसूल संरक्षण, अनधिकृत प्रवासाला आळा व पारदर्शक तिकीट व्यवस्थेसाठी कार्यरत तिकीट तपासनीसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
बहुअंगी तपासणी
विनातिकीट प्रवासी शोधण्यासाठी अनेक धोरणांचा अवलंब केला जात आहे. स्थानक तपासणी, सापळा तपासणी, अचानक छापा टाकून तपासणी , तटबंदी तपासणी, व्यापक तपासणी व मेगा तिकीट तपासणी मोहिमा यांचा त्यात समावेश आहे. ही कार्यवाही सर्व विभागांमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या, एक्स्प्रेस, विशेष रेल्वेगाड्या तसेच मुंबई विभागातील उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये केली जात असल्याचे सांगण्यात आले.
