मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वसई रोड स्थानकात सुधारात्मक कामे करण्यात येत आहेत. ही कामे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ अ (एमयूटीपी-३ अ) अंतर्गत करण्यात येत आहेत. या स्थानकातील व्यस्त फलाटवरील गर्दी विभाजित करण्यासाठी एक नवीन उन्नत डेक नुकताच प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.

वसई रोडच्या पूर्व येथील फलाट क्रमांक ४/५ आणि ६/७ ला जोडण्यासाठी ६ मीटर रुंदीचा एक नवीन पादचारी पूल बांधण्यात आला आहे. या पादचारी पुलावर दोन सरकते जिने आणि दोन जिने उभारण्यात आले आहेत. फलाट क्रमांक ७ वर चार पादचारी पुलांना जोडणारा २५० मीटर * १०मीटरचा एक उन्नत डेक तयार करण्यात येणार आहे. या डेकवर प्रवाशांसाठी चांगल्या सुविधेसाठी दोन सरकते जिने, एक उद््वाहक आणि पाच जिने असतील. तर, सध्या ६० मीटर *१० मीटरचा डेकचा एक भाग आधीच पूर्ण झाला असून तो भाग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.
तर, उर्वरित भागाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. फलाट क्रमांक ६/७ वर पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत. तसेच वसई रोड स्थानकात एक नवीन स्वच्छतागृह खुले करण्यात आले असून दुसऱ्या स्वच्छतागृहाचे काम सुरू आहे. प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी, तसेच मोठ्या संख्येने असलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन, सर्व कामे काळजीपूर्वक नियोजित टप्प्यांमध्ये केली जात आहेत. उर्वरित कामे वेळेवर पूर्ण केली जातील, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळातील (एमआरव्हीसी) अधिकाऱ्यांनी सांगितले.
