मुंबई : मुंबई महानगराचा फुगवटा वाढत असून डहाणूपर्यंत लोकवस्ती मोठ्याप्रमाणात वाढली आहे. नोकरदार वर्ग डहाणूवरून मुंबईत कामासाठी येतो. त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, विरार ते डहाणू रोड दरम्यान पहिल्यांदाच १५ डबा लोकल चालवण्यास सुरुवात केली जाणार आहे. १५ डबा लोकल सेवेमुळे एकाच लोकल फेरीत ३३ टक्के प्रवाशांची भर पडते.

पश्चिम रेल्वेद्वारे लोकल फेऱ्या आणि १५ डबा लोकल वाढवण्याचे सत्र सुरू आहे. मागील काही कालावधीत वातानुकूलित, सामान्य लोकलच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. तर, १५ डबा लोकलच्या संख्येत वाढ केली आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरळीत होत आहे. येत्या काही दिवसात पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दोन १५ डबा रेक दाखल झाले आहेत.

या लोकलच्या विरार ते डहाणू रोड दरम्यान प्रथमच १५ डबा लोकल चालवण्यात येईल. पश्चिम रेल्वेच्या विरार कारशेडमध्ये दोन १५ डबा रेक दाखल झाले आहेत. या १५ डबा लोकलच्या सुमारे १७ लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे. त्यानुसार १२ डब्याच्या १७ लोकल फेऱ्यांचे रुपांतर १५ डबा लोकल फेऱ्यात केले जाईल.

विरार ते डहाणू रोड ८ लोकल फेऱ्या आणि चर्चगेट ते विरार ९ लोकल फेऱ्या धावतील. विरार ते डहाणू दरम्यान प्रथमच १५ डबा लोकल धावेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

विरार ते डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत विरार स्थानकावर क्षमतेवाढीचे काम उल्लेखनीय प्रगतीच्या टप्प्यावर पोहोचले आहे. विरार रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ ए आणि ४ ए यांची रुंदी ६.५० मीटरवरून १०.५० मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे १५ डबा लोकल थांबविण्यासाठी त्यांचा विस्तार केला आहे. तसेच नवीन होम प्लॅटफॉर्म (फलाट क्रमांक ५ ए) पश्चिमेकडील बाजूस बांधण्यात आला आहे. हे सर्व काम फक्त चार महिन्यांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. विरार स्थानकावर करण्यात आलेली क्षमता वाढ ही या विभागाच्या वहन क्षमतेत वाढ करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. एमआरव्हीसी, पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने अशा प्रकारची कामे सातत्याने पार पाडत आहे, ज्यामुळे सुरक्षा अबाधित राहील आणि उपनगरी रेल्वे वाहतुकीत कमीत कमी अडथळा येईल. – विलास वाडेकर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी).

सध्या १५ डब्यांच्या २११ लोकल फेऱ्या धावत असून यात १६ लोकल फेऱ्यांची वाढ केली जाईल. तसेच अंधेरी ते वांद्रे धीम्या मार्गावर १५ डबा लोकल धावत नाही. त्यामुळे विलेपार्ले, सांताक्रूझ फलाटांची लांबी वाढवण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही कालावधीत धीम्या मार्गावरील प्रवाशांना १५ डबा लोकलची सेवा मिळेल.