मुंबई : लोकल, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या, सुट्टीकालीन विशेष रेल्वेगाड्यांमधील तिकीट नसलेल्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून सतत सखोल तिकीट तपासणी मोहिमा राबविल्या जात आहेत. त्यातून एप्रिल ते मे २०२५ या कालावधीत सखोल तिकीट तपासणी करून पश्चिम रेल्वेने ४३.५४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. उपनगरीय विभागातून ११.७१ कोटी रुपयांचा दंड गोळा करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेवरील लोकल आणि रेल्वेगाड्यांमध्ये विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढल्याने तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. वातानुकूलित लोकल आणि प्रथम श्रेणीच्या डब्यातून विनातिकीट प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांना गर्दीचा आणि असुविधेचा सामना करावा लावतो. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि चांगली सेवा मिळण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपासणी मोहीम राबविण्यात आली.
मे २०२५ दरम्यान ३.०२ लाख तिकीट नसलेल्या प्रवाशांना शोधण्यात आले आणि २१.६५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यात आरक्षित न केलेल्या सामानाची प्रकरणेही समाविष्ट आहेत. तसेच, मे २०२५ मध्ये, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात १.०४ लाखांहून अधिक प्रकरणे आढळून आली आणि ५.७१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
वातानुकूलित लोकलमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी अचानक तिकीट तपासणी मोहिमा देखील नियमितपणे राबवल्या जात आहेत. त्यामुळेच एप्रिल ते मे २०२५ पर्यंत १०,३०० हून अधिक अनधिकृत प्रवाशांना दंड करण्यात आला आणि सुमारे ३५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आली.