शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीला झोडून काढलं आहे. त्यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेचं हिंदुत्व कसं आहे? आणि भाजपाचं हिंदुत्व कसं आहे, यातील फरक सांगितला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, बोलायला विषय बरेच आहेत. पण नेमकं कशावर बोलायचं हा मुद्दा आहे. हल्ली विशेषत: सर्वच पक्ष हिंदुत्वाबाबत बोलत आहेत. त्यातही हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबतही होता. पण तो पक्ष देशाची दिशा भरकटवत आहे.

आमचं हिंदुत्व कसं आहे? हे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय. ते आम्हाला म्हणाले होते की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर देशात अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. तोच धागा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे, बाकीच्यांचं हिंदुत्व घंटादारी आहे. बसा बडवत, काय मिळालं घंटा? अहो गदा पेलायला पण हातामध्ये ताकद असली पाहिजे. अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे.

यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, ‘देवेंद्र फडणवीस एकदा बोलले होते की, यांचं हिंदुत्व गदाधारी नाही, गधाधारी आहे. हो त्यांचं बरोबर आहे, आमचं हिंदुत्व गधाधारी होतं. पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही त्यांना सोडलं. आमचे जे काही जुने फोटो त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांचा गैरसमज होत असेल की, आमचं हिंदुत्व गधाधारी आहे. पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही त्यांना सोडलं. त्या गध्याला आम्ही सोडून दिलं, कारण त्याचा उपयोग नाही. शेवटी गाढव ते गाढवच शेवटी. या गाढवाने आम्हाला लाथ मारायच्या आधी आम्हीच त्यांना लाथ मारली’, असंही ते म्हणाले.

त्यांनी पुढे म्हटलं की, गेल्या वेळी त्यांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या. भगव्या टोप्या कशाला? हिंदुत्व डोक्यात असतं. डोक्यातल्या मेंदूत असतं. टोपीवर हिंदुत्व नसतं. भगवी टोपी घालून तुम्ही हिंदुत्व दाखवत असाल, तर आरएसएसची टोपी काळी का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला. आम्ही हिंदू आहोत की नाही, हे ठरवणारे तुम्ही नाहीत. तुमचं विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा विचार दिला, तुम्ही हिंदुत्वाचा विकार करताय, असंही ठाकरे म्हणाले.