‘आर्यनला अमली पदार्थ दिल्याचा समाजमाध्यम संदेशांचा आधार अपुरा’

केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) नोंदवून घेतलेला पंचनामा बनावट आणि संशयास्पद वाटत असल्याचे नमूद करत न्यायालयाने त्याच्या सत्यतेवरही प्रश्न उपस्थित केला आहे.

मुंबई : केवळ व्हॉट्सअ‍ॅप संदेशांचा आधार घेऊन क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी आरोपी असलेल्या अचित कुमारने आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज यांना अमलीपदार्थ उपलब्ध करून दिल्याचे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने अचित याला जामीन मंजूर करताना नोंदवले आहे. केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) नोंदवून घेतलेला पंचनामा बनावट आणि संशयास्पद वाटत असल्याचे नमूद करत न्यायालयाने त्याच्या सत्यतेवरही प्रश्न उपस्थित केला आहे.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी गेल्या आठवड्यात अमलीपदार्थ विक्रेता अचित याला जामीन मंजूर केला होता. आर्यन आणि अचित यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संदेशाचा अपवाद वगळता अचित अमलीपदार्थ तस्करीत सहभागी असल्याचा  पुरावा नाही. व्हॉट्सअ‍ॅप संदेशांच्या आधारे अचित याने आर्यन आणि अरबाज यांना अमलीपदार्थ उपलब्ध केल्याचे म्हणता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.  अचितला अटक केल्यानंतर त्याच्या घरातून २.६ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आल्याचा एनसीबीचा आरोप आहे.

कट रचल्याचा पुरावा नाही

आर्यन आणि अचितने कोणत्याही प्रकारचा कट रचलेला नाही. तसेच आर्यनला जामीन मंजूर झालेला असताना त्या पार्श्वभूमीवर अचितही जामिनासाठी पात्र असल्याचे न्यायालयाने नमूद केले. शिवाय अचितला बेकायदा ताब्यात ठेवण्यात आल्याचेही न्यायालयाने म्हटले. त्याला ५ ऑक्टोबरला अटक करण्यात आली. मात्र त्याला दुसऱ्या दिवशी अटक केल्याचे दाखवण्यात आल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Whatsapp messaging support drug party case aryan khan central narcotics control department akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या