मुंबई : दरडोई उत्पन्नात राज्य सहाव्या क्रमांकावर असल्याचा दावा सरकार करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र केंद्रातील मोदी सरकारच्या आकडेवारीनुसार राज्याचा क्रमांक ११ वा असून आपण पुडूचेरीपेक्षाही मागे असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य गुंतवणुकीत तसेच विकास दरात आघाडीवर असल्याचा दावा केला. दरडोई उत्पन्नात राज्य सहाव्या क्रमांकावर असल्याच्या शिंदे यांच्या दाव्यावर चव्हाण यांनी आक्षेप घेत राज्याची घसरण होत असून आज महाराष्ट्र ११ क्रमांकावर असल्याचा दावा केला. मोदी सरकारच्या माहिती माहिती संचालनालच्या एका प्रसिद्धीपत्राचा हवाला देत चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्य ११ व्या क्रमांकावर असून पुडूचेरी सारखे राज्यही आपल्या पुढे असल्याचा टोला सरकारला लगावला. चव्हाण यांच्या या दाव्यावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. अशी कोणतेही आकडेवाही नसून राज्याच्या लोकसंख्येवरून दरडोई उत्पन्न ठरत असून दुष्काळ पडल्यास दरडोई उत्पन्न कमी होते असे फडणवीस यांनी सांगितले.