Uddhav Thackeray on Badlapur: दोन महिन्यापूर्वी बलात्कार करणाऱ्या आरोपीचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशी दिली गेली, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी येथील जाहीर भाषणात बोलत असताना केला होता. मुख्यमंत्र्यांच्या दाव्याचा व्हिडीओ आता काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून सोशल मीडियावर पसरविला जात आहे. तसेच कोणत्या प्रकरणातील आरोपीला फाशी झाली, याचा पुरावा मागितला जात आहे. आज शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनीही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून एकनाथ शिंदे यांच्या दाव्याची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या आरोपीला फाशी दिली गेली, असे सांगितले. त्याबद्दल एक वेगळी एसआयटी स्थापन करून सदर प्रकरणाची माहिती बाहेर काढावी. जलदगती न्यायालयात खटला चालवून दोन महिन्यात फाशी दिली गेली असेल तर ती माहिती समोर आली पाहीजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
हे वाचा >> ‘मुख्यमंत्री शिंदे आणि पोलीसही नराधमाइतकेच विकृत’, बदलापूर उद्रेकानंतर उद्धव ठाकरेंची टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणले? पाहा व्हिडीओ
क्षमता नसलेला माणूस मुख्यमंत्रीपदावर
“क्षमता नसलेला व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर आहे. त्यांना जनतेच्या भावनेशी फक्त खेळता येते. ही व्यक्ती गद्दार आहे आणि त्यांनी जनतेच्या भावनांशीही गद्दारी केली आहे, हे अधिक दुर्दैवी आहे”, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
हे ही वाचा >> “४ वर्षांच्या मुलींनाही सोडलं जात नाहीये, ही काय स्थिती आहे?” उच्च न्यायालयाने बदलापूर पोलिसांना फटकारलं; तपासावर ताशेरे!
बदलापूर येथे आंदोलन करणारे जर राजकीय लोक असतील तर त्यात गैर काय? असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. जर हे लोक रस्त्यावर उतरले नसते तर गुन्हा दाखल झाला नसता. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही बुधवारी (२१ ऑगस्ट) बदलापूर येथे वामन म्हात्रेच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. हे आंदोलन केले नसते तर तो सुटलाच असता. जर तुम्हाला आंदोलनात राजकारण वाटत असेल तर सत्ताधारीही तितकेच विकृत आहेत, असे टीकास्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.
२४ ऑगस्टच्या संपात सामील व्हा
कोलकातामध्ये बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात आगडोंब उसळला. अनेक घटना जेव्हा लागोपाठ घडतात, तेव्हा जनक्षोभाचा उद्रेक होतो. या जनक्षोभात कोणत्याही राजकीय पक्षाचा हात नाही. महाराष्ट्रात अशा विकृतांना कठोर शिक्षा होते, हा संदेश गेला पाहीजे, यासाठी आम्ही बंद पुकारला आहे. बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येते. २४ ऑगस्ट रोजी जात-धर्म-पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी या बंदमध्ये सहभागी झाले पाहीजे, असे त्यांनी आवाहन केले.