विश्वस्तांच्या पत्रानंतर पुन्हा गोंधळ

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण याचा निर्णय धर्मदाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट  असतानाच अध्यक्ष म्हणून नरेश गडेकर यांच्या नावे विश्वस्त शरद पवार आणि शशी प्रभू यांनी पत्र दिले आहे. या पत्रावरून विश्वस्तांनी नरेश गडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसत आहे.

नाट्य परिषदेच्या कलम १७(१) नुसार ७ विश्वस्त आणि २ पदसिद्ध असे एकूण ९ विश्वस्त परिषदेवर असणे अपेक्षित आहे. सध्या सातपैकी केवळ तीन जागा भरलेल्या असून चार पदे रिक्त आहेत. ही पदे तात्काळ भरण्याची कार्यवाही सुरू व्हावी यासाठी शरद पवार आणि शशी प्रभू या तहहयात विश्वस्तांनी अध्यक्ष नरेश गडेकर यांना पत्र दिले आहे.

गेल्या वर्षभरात नाट्य परिषदेत झालेले तीव्र वाद, अध्यक्ष बदल या सर्व घटनांचा निवडा धर्मदाय आयुक्तांकडे होणे बाकी आहे. तसेच ही अध्यक्ष निवड घटना बाह्य असल्याचा दावाही नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी असलेल्या प्रसाद कांबळी यांनी धर्मदाय आयुक्तांकडे केलेला असताना विश्वस्तांनी थेट नरेश गडेकर यांच्या नावाने पत्र काढल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. घटना दुरुस्त होण्याआधीच पुन्हा विश्वस्तांनी अशा पद्धतीची भूमिका बदल करणे हे आश्चार्यकारक आहे, असे प्रसाद कांबळी म्हणाले.