राज्यात २० जून ला विधानपरिषदच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये विधानसभेचे सदस्य हे १० जागांसाठी मतदान करणार आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे ५६, राष्ट्र्वादी काँग्रेसचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार आहेत, तर भाजपाचे १०५ असे प्रमुख राजकीय पक्षांचे बलाबल आहे. तर इतर पक्षांचे १६ आणि अपक्ष १३ आमदार आहेत. विधानसभेच्या एकुण आमदारांची संख्या आणि निवडणूकीच्या १० जागा लक्षात घेता विजय मिळवण्यासाठी २७ मतांची आवश्यकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडीचे संख्याबळ लक्षात घेतले तर पाच उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे, ते सहज निवडून येणार आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचे एक उमेदावार आहेत. काँग्रेस दुसरा म्हणजेच महाविकास आघाडी सहावा उमेदवार देणार हे आता स्पष्ट झाले आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार यांची जमवाजमव केल्यास, त्याचे गणित जुळल्यास सहावा उमेदवारही निवडून येण्याची सहज शक्यता आहे.

असं असतांना भाजपाने पाच उमेदवारांची घोषणा केल्याने चुरस निर्माण झाली आहे. भाजपाने प्रवीण दरेकर,राम शिंदे,प्रसाद लाड,श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी दिली आहे. भाजपाकडे अपक्ष आणि इतर छोटे पक्ष यांची ताकद लक्षात घेता भाजपाची संख्या ही ११३ पर्यंत सहज जाते. मात्र भाजपा यापेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा करत आला आहे. याच दाव्यावर भाजपाने पाचवा उमेदावर विधानपरिषद निवडणूकीत उतरवला आहे. तेव्हा महाविकास आघाडीकडे जाणाऱ्या किंवा तटस्थ रहाण्याची शक्यता असलेल्या छोटे पक्ष, अपक्ष आमदारांना आपल्या बाजुला वळवण्याचे आव्हान भाजपापुढे असणार आहे.

ज्याप्रमाणे राज्यसभा निवडणूकीत कोणतीही तडजोड महाविकास आघाडीशी करण्यास भाजपाने स्पष्ट नकार दिला होता, ज्यामुळे तेच पाऊल महाविकास आघाडी विधानपरिषद निवडणूकीत उचलणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे विधानपरिषदच्या निवडणूकीत १० जागांवर ११ उमेदवार अशी निवडणूक होणार आहे. तेव्हा प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी भाजपाचा पाचवा उमेदावार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीलं आहे. भाजपाकडून ओबीसी नेते राम शिंदे, फडणवीस यांचे विश्वासू श्रीकांत भारतीय आणि प्रवीण दरेकर ही नावे निश्चित समजली जात आहेत. तेव्हा उमा खापरे किंवा प्रसाद लाड यांच्यापैकी एक जण चौथ्या जागी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाचव्या उमेदवारासाठी विजय मिळवण्यासाठी भाजपाला आणखी जुळवाजुळव करावी लागणार आहे. भाजपाच्या सध्याच्या धक्कातंत्रानुसार उमेदवारांच्या क्रमावारीत शेवटच्या क्षणीही बदल होऊ शकतो. तेव्हा भाजपा पाचव्या उमेदवारासाठी मते कसे गोळा करणार किंवा राजकारणातील कुरघोडीमध्ये पाचव्या उमेदावाराचा निवडणूकीत बळी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is bjp fifth candidate in vidhanparishad election asj
First published on: 08-06-2022 at 14:48 IST