मुंबई: हवेतील घातक सूक्ष्मकणांचे आदर्श प्रमाण किती असावे याबाबत सुधारणा करून ‘जागतिक आरोग्य संघटने’ने वायू प्रदूषणाचे निकष नव्याने निश्चित केले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या प्रदूषणविषयक निकषांमध्येही बदल होणार असल्याची माहिती ‘केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्रालया’चे सहसंचालक डॉ. सुधीर चिंतालपती यांनी ‘क्लायमेट ट्रेण्ड’ने आयोजित केलेल्या एका ऑनलाइन चर्चासत्रात दिली.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २०१९ साली ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम’ जाहीर केला. याअंतर्गत देशातील प्रदूषण २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले. याच वेळी प्रदूषणाबाबतच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याची जाणीव मंत्रालयाला झाली होती. त्यामुळे टाळेबंदीत सर्व मानवी कृत्ये थांबलेली असताना सुधारलेल्या हवेबाबतची आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. तसेच हवा गुणवत्ता निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’  काम करत आहे. लवकरच नवे निकष जाहीर केले जातील, असे चिंतालपती यांनी सांगितले.

‘जागतिक आरोग्य संघटने’ने १६ वर्षांनी हवेच्या गुणवत्तेबाबतच्या निकषांमध्ये सुधारणा केली. यानुसार हवेतील सूक्ष्म प्रदूषकांचे आदर्श प्रमाण निम्म्यावर आले आहे. सुधारित निकषांचा विचार करता मुंबईच्या हवेतील पीएम २.५ चे (घातक सूक्ष्मकण) प्रमाण अपेक्षेपेक्षा ८ पटींनी अधिक आहे. तसेच दिल्लीच्या हवेतील पीएम २.५ चे प्रमाण १६.८ पटींनी अधिक आहे.