मुंबई अंडरवर्ल्ड यांचं नातं फार म्हणजे फारच जुनं आहे. मुंबई अंडरवर्ल्ड म्हटलं की कुणी दाऊदचं नाव घेईल. तर कुणी हाजी मस्तानचं. अरुण गवळी, बाबू रेशीम, छोटा राजन, मन्या सुर्वे अशीही नावं काहींच्या तोंडी येतील. या सगळ्यांमध्ये सर्वात वरचा क्रमांक लागतो तो कुख्यात डॉन करीम लालाचा. करीम लाला हा मुंबईचा पहिला कुख्यात डॉन. त्याने दाऊदला रस्त्यावर पळवून मारलं होतं. एवढंच नाही करीम लाला बाळासाहेब ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानीही गेला होता. दाऊदला त्याने रस्त्यावर पळवून का मारलं होतं? इथपासून ते करीमलालाचा शेवट कसा झाला? इथपर्यंत आपण जाणून घेणार आहोत.

करीमलाला मुंबईचा पहिला कुख्यात डॉन

करीम लाला मायानगरी असलेल्या मुंबईचा पहिला डॉन होता. दाऊद जन्मालाही आला नव्हता त्या काळात मुंबईच्या गुन्हेगारी विश्वावर करीम लाला राज्य करत होता. साधारण १९५० च्या दशकात करीम लालाने त्याचं गुन्हेगारी साम्राज्य निर्माण केलं आणि त्याचा विस्तारही केला. रॉबिन हूड या काल्पनिक पात्राशी त्याचं व्यक्तिमत्व मिळतंजुळतं होतं असंही अनेक जाणकार सांगतात. कारण तो गुन्हेगारी विश्वातून पैसे कमवत असला तरीही तो अनेकदा गरीबांना मदतही करायचा.

करीम लालाचं खरं नाव काय होतं?

करीम लालाचं पूर्ण नाव अब्दुल करीम शेख असं होतं. करीम लाला मूळचा अफगाणिस्तानचा होता. नोकरीच्या शोधात तो मुंबईत आला आणि त्यानंतर त्याने इथेच आपलं बस्तान बसवलं. सुरुवातीला त्याने छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. पण पुरेसे पैसे मिळेना तेव्हा त्याने गुन्हेगारी विश्वाकडे मोर्चा वळवला. करीम लालाने मुंबईतल्या ग्रँट रोड या ठिकाणी एका भाड्याच्या घरात जुगाराचा अड्डा सुरु केला होता. हा अड्डा काही वर्षांतच इतका मोठा झाला की मुंबईतला सर्वात मोठा जुगाराचा अड्डा म्हणून ओळखला जाऊ लागला. करीम लालाच्या घरी अनेक प्रसिद्ध व्यक्ती जुगार खेळायला येत असत. जुगारातून करीम लालाने अमाप पैसा मिळवला.

…आणि करीम खानचा करीम लाला झाला

करीम लालाने जो जुगाराचा अड्डा सुरु केला होता त्याला सोशल क्लब असं सभ्य नाव देण्यात आलं होतं. या सोशल क्लबमध्ये सगळ्या प्रकारचे लोक यायचे. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस या ठिकाणी नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत असे. जुगारात इतर कुणी श्रीमंत होवो किंवा न होवो करीम खानची तिजोरी दर महिन्याला दहा पटीने भरत होती. त्यामुळेच काही महिन्यांतच करीम खानला करीम लाला असं लोक म्हणू लागले पुढे आयुष्यभरासाठी त्याचं नाव तेच पडलं. जुगाराचा अड्डा सुरु असतानाच करीम लाला हा व्याजी पैसेही देत असे. तो त्या काळातला एकटा पठाण नव्हता. इतर अनेक पठाण होते ज्यांनी मुंबईत व्याजी पैसे देण्यास सुरुवात केली होती. पण करीम लाला आणि इतर पठाणांमध्ये हा फरक होता की त्यांचे जुगाराचे अड्डे नव्हते. करीम लालाने सोशल क्लबच्या नावे सुरु केलेला जुगाराचा अड्डा पुढे गुन्हेगारीचा अड्डा बनला. मारहाण, भांडण, फसवाफसवी, चोरी हे सगळं रोजच होऊ लागलं. पण पोलिसांना हप्ते देऊन करीम लाला सगळ्या प्रकरणांमधून सहीसलामत सुटत होता. ज्यामुळे मुंबईत त्याचा दबदबा वाढला. हुसैन जैदी यांनी लिहिलेल्या डोंगरी ते दुबई या पुस्तकात हा उल्लेख आहे.

करीम लालाची छडी ठरली होती चर्चेचा विषय

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर करीम लालाच काय सगळ्याच पठणांची राहणी बदलून गेली. करीम लालाच्या पठाणीची जागा सफारी सूटने घेतली. तसंच तो काळा गॉगल लावू लागला आणि कायमच महागडी सिगार किंवा पाइप ओढत असे. त्याच्या ५० व्या वाढदिवसाला त्याला एक महागडी छडी भेट दिली होती. ती पाहून सुरुवातीला तो चिडला होता. पण नंतर ती छडी तो शान म्हणून स्वतःकडे बाळगत असे. मुंबईत एक असाही काळ होता की करीम लाला कुठेही गेला की लोक त्याला आणि त्याची छडी बघायला गर्दी करायचे. अगदी तो मशिदीत गेला आणि मशिदीतून प्रसाधन गृहात बाहेर छडी ठेवून गेला तर लोकांची गर्दी होत असे.

करीम लालाने दाऊदला रस्त्यावर पळवून मारलं होतं?

मुंबईत जेव्हा दाऊदने तस्करीच्या धंद्यात हात घातला तर करीम लालाने त्याला विरोध दर्शवला. कारण त्याला ही बाब मुळीच आवडली नव्हती. यानंतर करीम लाला विरुद्ध दाऊद असा संघर्ष निर्माण झाला होता. दाऊद आणि करीम लाला यांच्यातला संघर्ष इतका वाढला की यावरुनच दाऊदला करीम लालाने पळवून पळवून मारलं होतं. मुंबईत तेव्हा प्रत्येकाच्या हद्दी वाटल्या गेल्या होत्या. करीम लाला, हाजी मस्तान हे एकमेकांच्या सीमा ओलांडून काम करत नसत. त्याचवेळी दाऊदने तस्करी करायला सुरुवात केली. १९८१ मध्ये करीम लालाच्या गँगने दाऊदचा भाऊ शब्बीरला ठार मारलं. ज्याचा बदला म्हणून १९८६ मध्ये दाऊद आणि त्याच्या साथीदारांनी १९८६ मध्ये करीम लालाच्या भावाची म्हणजेच रहीम खानची हत्या केली.

करीम लालाचा शेवट नेमका कसा झाला?

जुगाराचे अड्डे, कुंटणखाने, वेश्या व्यवसाय, हत्या, मारामारी, चोरी, दरोडे, खंडणी वसुली अशा सगळ्या गोष्टींमध्ये करीम लाला आणि त्याच्या गँगचा हात होता. करीम लालाला एक आजार झाला होता. ज्या आजारातच त्याने शेवटचे दिवस काढले तो १९ फेब्रुवारी २००२ ला त्याचा मृत्यू झाला. मुंबईचा पहिला डॉन जिवंत होता हे त्याच्या मृत्यूच्या बातमीने सगळ्या जगाला कळलं. कारण तोपर्यंत तो गुन्हेगारी विश्वापासून लांब गेला होता. नाकाम हसरतो काँ उठने को है जनाजा असं त्यावेळी म्हटलं गेलं होतं.