मुंबईतल्या कांदिवली या उपनगरात राहणाऱ्या रिद्धी ठक्करला याची कल्पनाही नसेल की तिच्यासारख्या उत्तम बाईकरचा मृत्यू छत्तीसगढमध्ये होईल. बस्तर या ठिकाणी २० बाईकर्सच्या ग्रुपसह पर्यटनासाठी रिद्धी गेली होती. तिचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी येऊन धडकली आणि तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली. तसंच कांदिवलीकरांनीही हळहळ व्यक्त केली आहे. आपण जाणून घेऊ कोण होती रिद्धी ठक्कर आणि तिचा अपघात कसा झाला?
रिद्धीचा अपघात नेमका कसा झाला?
रिद्धी ठक्कर ही २४ वर्षीय बाईकर मुलगी तिच्या मोटरसायकलची ट्रेलरला धडक लागल्याने खाली कोसळली. नॅशनल हायवे क्रमांक ३० वर मारकाटोला घाटात हा अपघात झाला. हे ठिकाण छत्तीसगढच्या धमतारी जिल्ह्यात आहे. बुधवारी सकाळच्या दरम्यान रिद्धीचा अपघात झाला. रायपूर कनकेर रस्त्यावर हा घाट आहे. तिथून ट्रेलर येत होता या ट्रेलरची आणि रिद्धीच्या बाईकची धडक झाली. ज्यानंतर तातडीने इमर्जन्सी क्रमांक ११२ वर संपर्क साधण्यात आला. सुरुवातीला रिद्धीला चारामा या ठिकाणी उपचारांसाठी नेण्यात आलं आणि त्यानंतर तिला धमतारी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. रिद्धीच्या बाईकला धडक देणारा ट्रेलर चालक पळून गेला आहे अशीही माहिती समोर आली आहे.
कोण होती रिद्धी ठक्कर?
रिद्धी ठक्कर ही मुंबईतल्या कांदिवली पश्चिममध्ये राहणारी तरुणी होती. सोशल मीडियावर तिने बाईकर म्हणून खूप ओळख मिळवली होती. @gearglimpse54 हे रिद्धीचं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. रिद्धीला २० हजार लोक फॉलो करत होते. रिद्धी ठक्कर कायमच तिचे खास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असे. अपघाताच्या पूर्वीही तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर म्हणजेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. हा आपला शेवटचा व्हिडीओ आहे याची तिला कल्पनाही नव्हती. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. रिद्धी ठक्कर गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शोभायात्रेतही तिच्या दुचाकीसह सहभागी होत होती. सोशल मीडियावरही ती आपल्या प्रवासाचे प्रत्येक अपडेट देत होती.

युट्यूबर म्हणूनही प्रसिद्ध होती रिद्धी ठक्कर
निधी ठक्कर ही २४ वर्षीय मुलगी Ridewithridz या नावाने युट्यूब चॅनलही चालवत होती. तिचा कंटेट हा मोटरसायकल, रायडिंग गिअर, हेल्मेट, बाईकशी संबंधित साधनं यावर आधारित होता. तिने मोटो व्ह्लॉग्सही सुरु केले होते. त्यात ती विविध रोड ट्रीप्सबाबत माहिती देत असे. युट्यूबवरही तिच्या व्हिडीओजना अनेकजण फॉलो करत होते. तिच्या सोशल मीडियावर असलेल्या माहितीनुसार ती एक उत्तम बाईकर होती. तसंच एक उत्साही आणि आयुष्याचा आनंद घेणारी मुलगी होती. रिद्धी ही एक स्वतंत्र विचारांची आनंदी मुलगी होती. तिच्या मृत्यूच्या बातमीनंतर सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त होते आहे आणि तिचे जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
