वर्षा बंगल्यामधील भिंतीवर तो मजकूर कोणी लिहिला?; अमृता फडणवीस यांनी दिले उत्तर

उद्धव ठाकरेंच्या नावातील अद्याक्षरे लिहून काही अपशब्द वर्षा बंगल्याच्या भिंतीवर लिहिले होते

अमृता फडणवीस यांनी दिले उत्तर
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवसस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यातील भिंतींवर काही अपशब्द लिहिल्याचे प्रकरण डिसेंबर महिन्यात समोर आलं होतं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर काही दिवसांमध्येच हे प्रकरण उघडकीस आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. भाजपा रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स’ अशा वाक्यांबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावातील अद्याक्षरे लिहून काही अपशब्द लिहिण्यात आले होते. मात्र आता या भिंतीवरील मजकुरासंबंधात माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला महिलादिनानिमित्त दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी भिंतीवरील मजकुरासंदर्भात भाष्य केलं आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं. त्यानंतर युतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपले शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडावा लागला. त्यानंतर काही दिवसांमध्ये या बंगल्यातील भिंतींवर भाजपाच्या समर्थनार्थ आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झालेल्या उद्धव यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह शब्द लिहिल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.

नक्की काय लिहिलं होतं भिंतीवर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या सुरूवातीच्या काही अक्षरांचा उल्लेख करत बंगल्याच्या भिंतीवर काही अपशब्द लिहिण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त ‘भाजपा रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स’ अशीही वाक्य भितींवर लिहिली होती.अमृता यांना विचारला तो प्रश्न

अमृता यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना, “मुख्यमंत्री पद सोडावं लागल्यानंतर तुम्हाला वर्षा बंगला सोडावा लागला. त्यानंतर वर्षा बंगल्यामधील भिंतीवर काही मजकूर रेखाटल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यावरुन अनेक वाद आणि चर्चा झाल्या. अगदी तुमच्या मुलीचाही त्यावेळेला उल्लेख झाला. ही सगळी परिस्थिती तुम्ही एक स्त्री, आई आणि पत्नी म्हणून कशी हाताळली,” असा प्रश्न विचारण्यात आला.

अमृता यांचे स्पष्टीकरण…

वर्षावरील भिंतींवरील मजकुरासंदर्भात स्पष्टीकरण देताना अमृता यांनी तो मजकूर कोणी लिहिला याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही असं स्पष्ट केलं. “जेव्हा आम्ही वर्षा बंगला खाली केला. सर्व काही तपासलेलं होतं. मात्र लहान मुलांना सवय असते कधी कधी रेघोट्या ओढायची भिंतीवर. आमच्या मुलीच्या बऱ्याच मैत्रिणी घरी यायच्या जायच्या. आम्ही बंगला सोडताना सर्व रुम तपासल्या तेव्हा तेथे काहीच नव्हतं. मात्र खाली कर्मचाऱ्यांच्या खोल्या (सर्व्हट क्वॉटर्स) आहेत. तिथे काही असल्यास मला त्याचा अंदाज नाही,” असं अमृता म्हणाल्या.

आमच्या मुलीने तो मजकूर लिहिला नाही

तो मजकूर आमच्या मुलीने म्हणजेच दिविजाने लिहिला नव्हता असंही आमृता यांनी यावेळी स्पष्ट केलं. “घरातील भिंतीवर मजकूर लिहिला असल्याची बातमी आम्हाला वृत्तपत्रांमधून घर सोडल्यानंतर एका महिन्याने समजली. या दरम्यानच्या काळात कोणी काही मस्ती म्हणून हे केलं असेल तर ते आम्हाला ठाऊक नाही. काही इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये यासंदर्भातील वृत्त पहिल्या पानावर होते. त्यामुळे आम्ही आमच्या मुलीकडे यासंदर्भात चौकशीही केली. आम्ही विचारलं तिला की तू लिहलं आहेस का? त्यावर तिने नाही आम्ही असं काहीही लिहिलेलं नव्हतं असं आम्हाला सांगितलं. हस्ताक्षरही तिच्यासारखं नाही. अनेक मुलं आमच्या घरी येतात. लहान मुलं अशाप्रकारे भिंतीवर लिहितात. त्यामुळे एकतर आम्ही घर सोडल्यानंतर ही बातमी समोर यायच्या कालावधीमध्ये कोणीतरी हे केलेलं असेल. तसं नसलं तर मुलींनी केलं असेल आणि ते सांगायला घाबरली असतील,” असं अमृता यांनी सांगितलं.

राजकारण करायची गरज नव्हती…

“वर्षावरील भिंतीवर लिहिलेल्या मजकूर हा राजकीय विषय बनवण्याची गरज नव्हती. मुलांच्या मनात आहे ते त्यांनी निखळपणे लिहिलं. राजकारण्यांना यावर भाष्य करण्याचा काय अधिकार आहे?,” असा सवालही अमृता यांनी उपस्थित केला.

त्यावेळी फडणवीस म्हणाले होते…

वर्षामधील भिंतींवरील मजकुराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं प्रतिक्रिया दिली होती. “फडणवीस यांनी बंगला सोडला त्यावेळी भितीवर कोणत्याही प्रकारचा मजकूर लिहिला नव्हता. हे अतिशय खालच्या स्तरावरील राजकारण आहे,” असं यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना, “आमची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असं सांगितलं होतं. “लोकांना सर्व काही समजतं,” असं म्हणत देवेंद्र यांच्या प्रतिक्रियेला शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Who wrote controversial statements on walls of cm varsha bungalow amruta fadnavis answers scsg