मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवार हे याआधीही अनेकदा अपघातातून बचावले होते. अपघाताचे अनुभव सांगताना मिश्किल विनोद करून इतरांना हसवणारे पवार आज मात्र या अपघातातून वाचू शकले नाहीत. त्यांच्या निधनाने राज्यावर शोककळा पसरली असून राजकारणापलीकडे विविध राजकीय नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यत अशा सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
अजित पवार यांचा जानेवारी २०२३ मध्ये पुण्यात लिफ्टमध्ये अपघात झाला होता. लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली होती. यात अजित पवार आणि इतर काही जण थोडक्यात वाचले होते. त्यांनतर या अपघाताचा अनुभव त्यांनी स्वतःच एका सभेत सांगितला होता. ‘एका रुग्णालयात उद््घाटन केल्यानंतर मी जिन्याने उतरून जात असतानाही लिफ्टने जायचा आग्रह झाला. लिफ्टने जात असताना वीज गेल्याने लिफ्ट धाडकन खाली आपटली, आम्ही थोडक्यात वाचलो, नाही तर आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला असता.’ असे ते म्हणाले होते. तसेच ही गोष्ट प्रसार माध्यमांना कळली की त्यांनी ती ‘ब्रेकिंग न्यूजच’ केली असती, असेही ते त्यावेळी म्हणाले होते. त्यांची शैली ही कायमच विनोदी आणि मिश्किल होती. यामुळे ते कोणत्याही सभेत एकाच वेळी गंभीर विषयावर भाष्य करीत आणि विनोदातून जमलेल्या कार्यकर्त्यांना हसवतही.
इतरांच्या अपघाताच्या वेळी कायम तत्पर
अजित पवार हे संवेदनशील नेते होते अशी भावना त्यांच्या अपघाती निधनानंतर व्यक्त होत आहे. त्यांनी अनेकांना अपघाताच्या वेळी मदत केली होती. बारामतीमधील आठ तरुण २०२३ मध्ये दोन गाड्यांमधून गोव्याला निघाले होते. त्यांच्या गाडीला पोलादपूर घाटात टँकरने जोरदार धडक दिली. त्यानंतर एका कार्यकर्त्याने रात्री २ वाजता अजित पवार यांना फोन केल्यानंतर त्यांनी तातडीने मदत पोहोचवण्याची व्यवस्था केली. तसेच त्यांनी अनेक वेळा अपघातग्रस्तांना स्वतःच्या गाडीने रुग्णालयात पोहोचवले होते.
दरम्यान, अजित पवार यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी बारामतीत गर्दी केली. सध्या अजित पवार यांचे पार्थिव बारामतीमधील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. रुग्णालयाच्या बाहेर कार्यकर्त्यानी मोठी गर्दी केली आहे. अजित पवार यांचे कुटुंबीय बारामती येथे दाखल होत आहेत. शरद पवार आणि प्रतिभा पवार बारामतीत दाखल झाले आहेत. तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते आणि अजित पवार यांचे निकटवर्तीयही बारामतीत दाखल होत आहेत.
