गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने मुंबईत गणेश मूर्ती आगमनाचे सोहळे सुरु झाले आहेत. मागील दोन आठवड्यांपासून बाप्पाच्या मूर्तींच्या आगमन सोहळे सुरू झाले आहेत. २२ ऑगस्टच्या रात्री मात्र एक धक्कादायक घटना घडली आणि आगमन सोहळ्याला गालबोट लागलं. मुंबईतील भुलेश्वरचा राजाचे आगमन सुरू असताना गणपतीची मूर्ती कोसळली. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले. या घटनेत मंडळाचे अध्यक्षच ठार झाल्याने या वर्षी या मंडळाने गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण घटनेबाबत प्रसिद्ध मूर्तीकार अरुण दत्ते यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. मूर्तीकारांनी आणि मंडळांनी कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत अरुण दत्ते यांनी भाष्य केलं आहे.
मूर्तीकार अरुण दत्ते यांनी काय म्हटलं आहे?
भुलेश्वरचा राजा या गणपतीच्या बाबतीत जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच ही घटना घडल्यामुळे काही प्रमाणात सगळीच मंडळं आणि मूर्तीकार हे घाबरले आहेत. मला इतकंच सांगायचं आहे की एखादा मूर्तीकार जर भव्य मूर्ती घडवतो आहे तर त्याने त्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य आणि त्या मूर्तीची बळकटी याबाबत सगळी खात्री वारंवार केली पाहिजे. जर एखादा मूर्तीकार भव्य मूर्ती साकारतो आहे तर मंडळानेही ही माहिती घेतली पाहिजे की मूर्तीकार अनुभवी आहे का? त्याने आधी काही अशा प्रकारच्या मूर्ती केल्या आहेत का? नवीन मूर्तीकार इतके आले आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला भव्य मूर्ती घडवायची आहे तर तुम्ही अनुभवी मूर्तीकारांचा सल्ला घ्या. जेणेकरुन असे काही प्रकार घडणार नाहीत असं मत प्रसिद्ध मूर्तीकार अरुण दत्ते यांनी व्यक्त केलं. अरुण दत्ते यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. तसंच घडलेली घटना दुर्दैवी असून मी कुणाला दोष देणार नाही पण यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.
मूर्तीकाराला दोष दिला जातो पण मंडळाचीही जबाबादारी असते-अरुण दत्ते
एखाद्या मंडळाकडून मूर्तीकाराला मूर्ती बनवण्यासाठी सांगितलं जातं आहे तर त्यांनी पाट मजबूत आहे का? जे लोखंड वापरलं जातं आहे ते योग्य आहे का? गणपतीच्या मूर्तीसाठी जो लोखंडी साचा उभा केला जातो तो योग्य आणि मजबूत आहे ना? या सगळ्या गोष्टी मंडळानेही तपासल्या पाहिजेत. अशी काही घटना घडली की पहिला दोष मूर्तीकाराला दिला जातो की मूर्तीकाराने मूर्ती व्यवस्थित घडवली नसेल. पण मला वाटतं की मंडळांनीही सगळी काळजी घेतली पाहिजे असं अरुण दत्ते म्हणाले.
भुलेश्वरच्या राजाची मूर्ती का कोसळली काय म्हणाले दत्ते?
भुलेश्वरचा राजा ही गणपतीची मूर्ती कोसळली ती मंडपाच्या जवळ जाऊन कोसळली. ती मूर्ती बसलेली होती आणि तरीही कोसळली याचा अर्थ असा असू शकतो की ती मूर्ती इथून निघाल्यापासूनच कुठेतरी सुरुवात झाली होती. गणपतीच्या मूर्तीची ट्रॉली ही वेगात चाललेली नव्हती. मूर्तीकाराच्या कारखान्यापासून दोन ते चार तास लागले. त्यामुळे ट्रॉलीचा वेग जास्त होता हे म्हणता येणार नाही. पण मंडळाने ट्रॉली कशी खेचली? मधे काही अडथळे आले का? मूर्तीकाराने वेल्डिंग योग्य पद्धतीने केलं होतं का? अशा खूप प्रश्नांची चर्चा होते आहे. पण आपण मला वाटतं दोष कुणालाही द्यायला नको. मूर्तीकाराने सुंदर मूर्ती बनवली होती आणि ती पडली. त्यात दोघांचा बळी गेला. ही घटना दुर्दैवी आहे. एवढंच मी म्हणेन असं अरुण दत्ते यांनी म्हटलं आहे.
