१ ते ७ जुलैच्या दरम्यान कुलाबा येथील वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार ७९१ मिमी पाऊस झाला आहे. मुंबईत जुलै महिन्यात दरवर्षी सरासरी ७६८.५ मिमी इतका पाऊस पडतो. मात्र या वर्षी अवघ्या पाच दिवसांत इतका पाऊस मुंबईत झाला आहे. दुसरीकडे सांताक्रुझ येथे झालेल्या नोंदीनुसार ८७९ मिमी पाऊस १ ते ७ जुलै या कालावधीत झाला आहे. दरवर्षी जुलैच्या संपूर्ण महिन्यात इथे ९१९ मिमी पाऊस सरासरी नोंदवला जातो. विशेष बाब म्हणजे एल निनो जाहीर झालेला असूनही इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. तसंच हा पाऊस थांबलेला नाही अजूनही मुंबईसह राज्यात पाऊस सुरुच आहे.

एल निनोचा प्रभाव असूनही पाऊस का कोसळतो?

एल निनोचा प्रभाव असूनही इतका पाऊस का पडतो आहे? या प्रश्नाचा विचार केला तर लक्षात येतं की हा हवामानातील एक महत्त्वाचा बदल आहे. एल निनोमुळे मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढते. त्यामुळे नैऋत्य मान्सूनच्या आगमनाला अनेकदा उशीर होतो. यंदा मुंबईसह राज्यभरात पाऊस पडण्यासाठी दोन ते तीन आठवडे विलंब झाला. मात्र जून महिन्याच्या अखेरीस मान्सून सक्रिय झाला आणि त्यानंतर मुंबईसह कोकण किनारपट्टी तसेच महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.

एल निनोचा प्रभाव आणि मुसळधार पाऊस हा विरोधाभास नाही

एल निनोचा प्रभाव आणि मुसळधार पाऊस हा विरोधाभास नाही असं मत हवामान खात्यातील तज्ञ्जांनी आणि शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. एल निनोचा प्रभाव अजूनही मान्सून कधी दाखल होईल आणि तो किती सक्रिय राहील यावर होतो, असं असलं तरीही ज्याला ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमानवाढ असं म्हटलं जातं त्यामुळे पावसाच्या स्वरूपात मोठे बदल होत आहेत. हवामान प्रणाली सक्रिय झाल्यानंतर पाऊस अधिक अनियमित आणि अधिक तीव्र स्वरूपाचा होत असल्याचं मागच्या काही वर्षांमध्ये दिसून आलं आहे. सध्या जो पाऊस पडतो आहे ती परिस्थितीही दीर्घकालीन पाऊस पद्धतीच्या बदललेल्या प्रकारांना सुसंगत आहे असं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. १९८१ ते २००० या कालावधीत मुंबईत सरासरी वार्षिक २३८५.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, २००१ ते २०२४ या कालावधीत ही सरासरी वाढून २६७२.७ मिमी इतकी झाली आहे. याचाच अर्थ मुंबईतला सरासरी पाऊस हा १५ टक्क्यांनी वाढल्याचं दिसून येतं आहे.