मुंबईतील रस्त्यांवर उत्सव काळात मंडप उभारण्यासाठी खोदलेले खड्डे न बुजविणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव, तसेच नवरात्रौत्सव मंडळांना प्रतिखड्डा दोन हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. मग खड्डेमय आणि ओबडधोबड रस्त्यांसाठी जबाबदार धरून मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दंड का करू नये, असा सवाल सामाजिक संस्थांनी उपस्थित केला आहे. वाचडॉग फाऊंडेशनने अशा आशयाचे पत्रच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.

हेही वाचा >>> “मग घ्या ना धौती योग”, आशिष शेलारांचा शिवसेनेला खोचक टोला; ‘थापां’चाही केला उल्लेख!

मुंबईतील खड्डेमय रस्त्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘वॉचडॉग फाऊंडेशन’ने नवरात्रौत्सवानिमित्त खड्डयांना नऊ रंगात रंगवण्याचे आंदोलन सुरू केले आहे. गेली काही वर्षे सातत्याने खड्डे आणि खराब रस्ते याबाबत आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधून जनजागृती करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी समाज माध्यमांवर महानगरपालिकेच्या रस्ते विभागावर टीका केली आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची निर्मिती, खड्डे त्वरित न बुजवणे, रस्ते दुरुस्ती किंवा रस्ते बांधणी करत असताना त्यावर योग्य देखरेख नसणे या त्रुटींसाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.खड्डे नवरंगात रंगवण्याच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून बुधवारी निळ्या रंगात खड्डे रंगवण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्या विभागातील खड्ड्यांची महानगरपालिकेकडे तक्रार करावी आणि त्याबाबत संस्थेला कळवावे, असे आवाहन ‘वाचडॉग फाऊंडेशन’ने केले आहे.