राज्य सरकारप्रमाणेच आता पालिकेने मृत कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीने पुनर्विवाह केल्यानंतरही तिला निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुनर्विवाह केलेल्या विधवा महिलांना दिलासा मिळणार आहे.
पालिका कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नींनी पुनर्विवाह केल्यानंतर त्यांना देण्यात येणारे कुटुंब निवृत्तीवेतन बंद करण्यात येत होते. कर्मचाऱ्यांच्या विधवांनी पुनर्विवाह केल्यानंतरही त्यांना कुटुंब निवृत्तीवेतन देण्यात यावे अशी ठरावाची सूचना जुलै २०१५ मध्ये पालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजूर केली होती. त्यानंतर ही ठरावाची सूचना अभिप्रायासाठी पालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आली होती.
पालिकेच्या निवृत्तीवेतन नियमांमध्ये कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीने पुनर्विवाह केल्यास तिला कुटुंब निवृत्तीवेतन देण्याची तरतूद नाही. मात्र राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीस तिच्या मृत्यूपर्यंत कुटुंब निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पालिका प्रशासनानेही कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीस कुटुंब निवृत्तीवेतन देण्याची तयारी दर्शविली आहे. वरील ठरावाच्या सूचनेवर अभिप्राय पालिका प्रशासनाने तयार केला असून तो स्थायी समितीमध्ये सादर करण्यात येणार आहे. नंतर तो सभागृहात सादर करण्यात येईल. सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.