मुंबई : मृत पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला मंत्रालयातील कोट्यातून घर देण्याचे आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी बोरिवली येथील रहिवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

५८ वर्षीय तक्रारदार महिलेचा पती २०१७ मध्ये पोलीस दलातून निवृत्त झाले होते. त्यांच्या पतीचा मार्च २०२४ मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला. पतीच्या उपचारादरम्यान त्यांची किरण महाडिक नावाच्या व्यक्तीबरोबर ओळख झाली. त्यावेळी त्याने महिलेच्या कुटुंबियांशीही परिचय वाढवला. तो मंत्रालयातील व्यक्तींच्या संपर्कात होता.

राजकीयदृष्ट्या प्रभावशाली असलेले मंदार बोरकर याच्याशी आपली ओळख असून तो म्हाडातील अधिकाऱ्यांचा निटवर्ती असल्याने चिकुवाडी, बोरिवली (प.) येथील म्हाडा इमारतीत १० टक्के सवलतीत सदनिका मिळवून देऊ शकतो, असे महाडिकने सदर महिलेस पतीच्या निधनानंतर सांगितले. संबंधित सदनिकेची किमत ७० लाख रुपये असल्याचे महाडिकने सांगितले. मात्र, तक्रारदार महिलेने ती रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर महाडिकने सुरुवातीला कमीत कमी २० लाख रुपये भरावे व उर्वरित रक्कम कर्जाद्वारे उभी करावी, असे सांगून तिला पैसे देण्यास प्रवृत्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर विविध कारणे देत त्याने तिला अधिक रक्कम भरण्यास भाग पाडले. एकूणच, महिलेने त्याला सुमारे ५० लाख रुपये दिले. बहुतांश रक्कम एटीएममधून रोख स्वरुपात काढून तिने त्याला दिली. याबाबतची माहिती तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे. काही रक्कम उभी करण्यासाठी तिने आपले दागिनेही विकले. सदनिका मिळत नसल्याने शेवटी या महिलेने चारकोप पोलिसांकडे धाव घेतली व मंगळवारी अधिकृत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी महाडिकविरोधात फसवणूक व फौजदारी विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चारकोप पोलीस तपास करत आहेत.