Wife Sells Flat Fake Death Certificate Mumbai: पती जिवंत असतानाही त्याचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून संयुक्त मालकीचा कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील बोरीवलीमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. फसवणूक झालेल्या पतीने पोलिसांत धाव घेतल्यानंतर हा संपूर्ण गैरप्रकार समोर आला.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, तक्रारदार रायन क्रास्टा हे कुलाब्यातील ‘हॉटेल ताज’ येथे वरिष्ठ शिफ्ट ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. २००७ मध्ये त्यांचा विवाह शालिनी डायना क्रास्टा हिच्याशी झाला होता. २०१६ मध्ये या दाम्पत्याने बोरीवलीतील एल. एम. रोडवरील ‘राज व्हिला को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी’मध्ये ७३.८० लाख रुपयांना १ बीएचके फ्लॅट खरेदी केला होता.
हा फ्लॅट दोघांच्या नावावर होता आणि त्यासाठी ५६ लाख रुपयांचे गृहकर्जही घेण्यात आले होते. तक्रारीनुसार, या कर्जाचे सर्व हप्ते रायन यांनी भरले होते. मात्र, कालांतराने कौटुंबिक वादामुळे दोघेही विभक्त राहू लागले.
असा उघडकीस आला प्रकार
मे महिन्यात रायन यांचे मित्र प्रसाद पाताडे यांनी त्यांना एका खासगी बँकेच्या व्यवहाराबद्दल माहिती दिली. बोरीवलीतील संबंधित फ्लॅट गहाण ठेवून धर्मेश जगदीश तन्ना आणि त्यांची पत्नी धारा धर्मेश तन्ना यांनी १.११ कोटींचे कर्ज मंजूर करून घेतल्याचे त्यांना समजले.
या प्रकारानंतर रायन आणि त्यांच्या आईने तत्काळ संबंधित बँकेत जाऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. शालिनीने ११ एप्रिल २०२५ रोजी नोंदणीकृत दस्ताऐवजाद्वारे हा फ्लॅट तन्ना दाम्पत्याला विकल्याचे निष्पन्न झाले.
बनावट मृत्यू प्रमाणपत्र आणि एनओसी
फ्लॅट विकण्यासाठी शालिनीने पती रायन यांचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र, सोसायटीचे खोटे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आणि स्वतःला त्यांची कायदेशीर वारसदार दर्शवणारे प्रतिज्ञापत्र तयार केले होते. रायन यांनी सोसायटीचे अध्यक्ष गौतम पुरोहित, सचिव पूजा पाताडे आणि खजिनदार एस. पाटील यांच्याकडे चौकशी केली असता, अशी कोणतीही एनओसी दिली नसल्याचे तसेच त्यावर असलेल्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक तपासानुसार, शालिनीने तन्ना कुटुंबीयांकडून फ्लॅटच्या मोबदल्यात १.११ कोटी रुपये उकळले. ही रक्कम तिने कुठे गुंतवली आणि कशासाठी वापरली, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच तिला बनावट मृत्यू प्रमाणपत्र व एनओसी तयार करण्यास कोणी मदत केली, याचाही शोध घेतला जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शालिनी यांना ९ सप्टेंबर रोजी अटक करून बोरीवली दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
