येत्या आठवडय़ात पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ; महिन्याला तीन जीबी मोफत डेटावापर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईला स्मार्ट सिटी करण्याच्या राज्य सरकारच्या उपाययोजनांतून शहरात सुमारे ५०० ‘हॉटस्पॉट’ जोडण्यांचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच मुंबईकरांना मोफत वायफाय सेवेचा लाभ घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या आठवडय़ात या सुविधेचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. या सुविधेद्वारे मुंबईकरांना महिन्याला मोफत तीन जीबी डेटापर्यंत वायफाय वापरता येणार आहे. मात्र, दिवसाला केवळ अर्धा तास १०० एमबीपर्यंतच्या डेटावापराची परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने संपूर्ण मुंबईत एक हजार पाचशे हॉटस्पॉट बसवण्याचे योजले आहे. त्यातील मुंबईतील काही भागांत पहिल्या टप्प्यात ५०० हॉटस्पॉट बसवण्यात आले आहेत. यासाठी अंदाजे १९४ कोटी रुपये खर्च आला आहे. चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, रेल्वे स्थानक परिसर आदी वर्दळीच्या ठिकाणी जास्तीत जास्त हॉटस्पॉट ‘अ‍ॅक्सेस पॉइंट’ लावण्यात आले आहेत. या ठिकाणी एका ‘अ‍ॅक्सेस पॉइंट’ला एकाच वेळी २० ते २५ जण जोडले जाऊ शकतील. ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’च्या ‘एमसीएस’ या कंपनीला हॉटस्पॉट बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. एचपी कंपनीचे दोन हजार ‘अ‍ॅक्सेस पॉइंट’ व फोटीनेट कंपनीचे ६०० ‘अ‍ॅक्सेस पॉइंट’ लावण्यात आले आहेत. मंत्रालयाचा आरसा गेट, गार्डन गेट, गिरगाव चौपाटी आदी महत्त्वाच्या ठिकाणांसह सुमारे ५०० हॉटस्पॉटची चाचणी करण्यात आली आहे.

[jwplayer fBUI0rBd]

वायफायला जोडण्यासाठी भ्रमणध्वनीचा क्रमांक नोंदणी केल्यावर त्यावर एक ‘वन टाइम’ पासवर्ड येईल. त्यानंतर वायफायशी जोडून घेता येईल. दिवसभरात एका व्यक्तीला फक्त अर्धा तास १०० एमबीपर्यंत डेटा वापरता येईल. त्यानंतर तो आपोआप इंटरनेटपासून तोडला जाईल.

सेनेवर कुरघोडी

आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईकरांना खूश करण्यासाठी व शिवसेनेला शह देण्याच्या हेतूने भाजपने वायफाय जोडणी करण्यात पुढाकार घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. कारण, मुंबईला वायफाय जोडणी देण्याचे आश्वासन सेनेने २०१२च्या महापालिका निवडणुकीच्या जाहिरनाम्यात दिले होते. परंतु, राज्य सरकारने पुढाकार घेऊन सेनेवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.

वापरायोग्य नसलेली संकेतस्थळे ब्लॉक

या वायफाय सेवेत वापरायोग्य नसलेली सर्व संकेतस्थळे ब्लॉक करण्यात आलेल्या आहेत. त्याच वेळी अर्धा तास झाल्यावरही सरकारी संकेतस्थळाशी वापरकर्ता जोडला जाऊ शकेल. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक प्रकल्पांत या वायफाय सेवेचा फायदा होईल.

[jwplayer VRpN0AK0]

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wifi facility in mumbai
First published on: 08-12-2016 at 02:43 IST