राजधानी एक्स्प्रेस किंवा विमान प्रवासात मिळणारी मोफत मनोरंजनाची सुविधा आता राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाडय़ांमध्ये मोफत मिळणार आहे. एसटीच्या लांब पल्ल्याच्या सर्व गाडय़ांमध्ये लवकरच ‘क्वीक एन्टरटेनमेंट’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या गाडय़ामंध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार एसटीतून प्रवास करतांना ‘स्मार्ट फोन’च्या माध्यमातून हवा तो कार्यक्रम, चित्रपट, नाटक वा गाणी पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
प्रवाशांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे सुविधा निर्माण करण्याचे धोरण स्वीकारणाऱ्या परिवहन महामंडळाने शिवनेरीत दिल्या जाणाऱ्या मोफत वर्तमानपत्र सुविधेच्या एक पाऊल पुढे जात लांब पल्ल्याच्या एसटी गाडय़ांमध्ये प्रवाशांच्या सेवेत मनोरंजनाची मेजवानी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार ‘व्हॅल्युएबल’ ग्रुपचे अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने क्वीक एन्टरटेनमेंटची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. महामंडळावर कोणताही आर्थिक भार न पडता प्रवाशांना मोफत मनोरंजनाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत स्वारस्य अभिव्यक्तीचे (एओआय) प्रस्ताव मागविण्यात आल्याचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले.

’क्वीक एन्टरटेनमेंटचा बॉक्स एसटीत बसविण्यात येणार आहे. त्यात मराठी, हिन्दी, इंग्रजी भाषेतील चित्रपट, मराठी, हिन्दी गाणी, नाटक अशा मनोरंजनाचा खजिना आणि वायफायची सुविधा.
’एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला वायफायच्या माध्यमातून आपला स्मार्ट फोन क्वीक एन्टरटेनमेंटशी जोडता येईल आणि हवे ते चित्रपट, नाटक पाहता येतील.

महामंडळाला प्रस्ताव देण्यात आला असून या सुविधेच्या बदल्यात महामंडळावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही, उलट जाहिरातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही रक्कम एसटीला मिळेल.
नरेंद्र हेटे , उपाध्यक्ष व्हॅल्युएबल ग्रुप