Golden Jackal in Mumbai : मुंबईत एकेकाळी घनदाट जंगल होते. मुंबईतील टेकड्यांवर असंख्य पशु पक्ष्यांच्या प्रजाती आढळत होत्या. कालौघात प्राणी पक्ष्यांची संख्या कमी झाली असली तरीही मुंबईतील अनेक परिसरात जंगली प्राण्यांचं दर्शन होत असतं. बोरिवीलतील नॅशनल पार्क जवळील अनेक भागांमध्ये बिबट्याचा वावर सहज दिसतो. तर आता विक्रोळीत चक्क सोनेरी कोल्हा दिसल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

मुंबईचं शहरीकरण झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील वन्यप्रजाती नष्ट होत गेली. परंतु, वाढत्या शहरीकरणाला तोंड देत तग धरून राहिलेले अनेक प्राणी आहेत. त्यातील एक म्हणजे दुर्मीळ सोनेरी कोल्हा. विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर येथील रहिवाशांनी दोन दिवसांपूर्वी लांडगा सदृश प्राणी पाहिला. या प्राण्याकडून स्थानिक कुत्र्यांवर हल्ले होत असल्याची माहिती रहिवाशांनी मुंबई परिक्षेत्र वनविभागाला दिली आहे. येथे असलेल्या सोनेरी कोल्ह्यांना ते लांडगे समजले असावे, असं वन अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

ते कोल्हे की लांडगे?

मुंबई वन विभागाचे मानद वन्यजीव वॉर्डन पवन शर्मा म्हणाले,सोनेही कोल्ह्यांचया प्रजातींसह कोल्हे विक्रोळी (पूर्व) आणि कन्नमवार नगरच्या किनारी प्रदेशात आणि आसपासच्या खारफुटीच्या जंगलात राहतात. हे कोल्हे कधीतरी मानवी वस्तीजवळ येत असावेत. उत्तर प्रदेशात लांडगे मानवी वस्तीत शिरत असल्याचे अनेक वृत्त येत असल्याने विक्रोळीकरांनाही हे लांडगेच असल्याचं वाटलं असवां. एका स्थानिक रहिवाशाने याबाबत पोलिसांना माहिती दिली, सोनेरी कोल्ह्यांना पाहिल्यावर कुत्रे जोरात भुंकतात. या भुंकण्याचा आणि कुत्र्‍यांच्या रडण्याचा आवाज अनेक नागरिकांनी आवाज ऐकला आहे.

कन्नमवार नगरच्या खारफुटीमध्ये सोनेरी कोल्हे

वाढत्या मानवी वसाहतींमुळे वन्यप्राण्यांना हानी पोहोचत आहे. त्यामुळे सोनेरी कोल्ह्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करण्याची विनंती पर्यावरणवाद्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. कन्नमवार नगर येथील खारफुटीमध्ये निश्चितच सोनेरी कोल्हे आहेत. परंतु, तिथे मानवी वस्ती वाढत असल्याने वन्यजीवांना त्रास होतो, असं वनशक्ती समूहाचे पर्यावरणतज्ज्ञ डी. स्टॅलिन यांनी टाइम्स ऑफ इंडियाला म्हटलंय.

दरम्यान, सोनेरी कोल्हा कांदळवन परिसंस्थेतील प्रमुख सस्तन प्राणी आहे. मुंबईचा पश्चिम किनारा, मध्य मुंबई आणि नवी मुंबईतील काही भाग, तसेच ठाणे खाडीच्या आसपास असलेल्या कांदळवनामुळे जैवविविधतेला मोठ्या प्रमाणावर आधार मिळाला आहे. यामध्ये प्रामुख्याने सोनेरी कोल्हा दृष्टीस पडतो. मागील अनेक वर्षांपासून मुंबई महानगरात कांदळवनाच्या भागात कोल्हे आढळून आले आहेत. अनेक वेळा विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदिवली, ऐरोली, विरार, चेंबूर येथील कांदळवन क्षेत्रालगतच्या मानवी वस्तीत सोनेरी कोल्हा शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.

सोनेरी कोल्ह्याच्या ठिकाणांचा, मार्गाचा अभ्यास झालेला नाही. सोनेरी कोल्हा युरोप, आफ्रिका, आशियाच्या काही भागात आढळतो. मुंबईत खाडीलगत, कांदळवनात सोनेरी कोल्हा दिसतो. सोनेरी कोल्हा हा वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूची तीन अंतर्गत संरक्षित आहे.