मुंबई : वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने ‘रीवाइल्ड सँक्चुअरी अँड चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेच्या वतीने संरक्षित प्राण्यांबद्दल जनजागृतीसाठी, भारतातील वन्य पक्षी आणि प्राणी तसेच कासव आणि इतर वन्यजीव प्रजातींची तस्करी रोखावी, तसेच त्यांचा वापर पाळीव प्राणी म्हणून होऊ नये यासाठी संपूर्ण राज्यभरात एका विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. नुकताच महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
भारतात संरक्षित वन्य प्राण्यांना घरात बाळगणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांची तस्करीही मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांची बेकायदेशीररित्या होणारी खरेदी-विक्री थांबविणे हे सध्या व्यवस्थेसमोरील आव्हान आहे. याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून यावेळी भारतात पाळीव प्राणी म्हणून सर्वाधिक प्रमाणात तस्करी होणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे घरात ठेवल्या जाणाऱ्या वन्यजीवांच्या प्रजातींवर आधारित माहिती फलकांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हे फलक राज्यभरातील ५०० हून अधिक पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये लावण्यात येणार आहेत.
‘तस्करीबाबत जागरूकता हवी’
संस्थेच्या म्हणण्यानुसार, वन्यजीवांना पाळीव प्राणी म्हणून घरी ठेवण्याची मागणी वाढत असून त्यामुळे त्यांच्या बेकारीदेशीर शिकारीला, तस्करीला आणि चुकीच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या संगोपनाला कारणीभूत आहे. या सगळ्याची परिणीती अनेकदा वन्यजीवांना बेवारसपणे सोडून देण्यात होते. वन्यजीवांची तस्करी रोखण्यात जागरूकता हे सगळ्यात महत्त्वाचे साधन आहे, असे संस्थेच्या अध्यक्ष डॉ. रिना देव यांनी सांगितले.
… तर कारवाई होऊ शकते
घरात पाळल्या जाणाऱ्या अनेक प्रजाती या वन्यजीव कायदा, १९७२ च्या अनुसूची १ आणि २ अंतर्गत संरक्षित आहेत. अशा प्रजाती बाजारात उपलब्ध आहेत म्हणून त्या घरात पाळणे हे बेकायदेशीर कृत्य असून याबाबत कारवाई होऊ शकते. यासाठीची जनजागृती वाढावी या उद्देशाने मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, असे मुंबईतील वन्यजीवांसाठी कार्य करणाऱ्या ‘रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाईफ वेल्फेअर’ (रॉ) संस्थेचे अध्यक्ष पवन शर्मा यांनी सांगितले.
