मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दगा दिल्यापासून राज्यातील राजकारण बदलले. आजच्या परिस्थितीत राजकारणात टिकायचे असेल तर हातावर हात ठेवून राजकारण करता येत नाही. तर नवे मार्ग शोधून प्रसंगी तडजोडी कराव्या लागणे हे अपरिहार्य झाले आहे. आजच्या राजकारणाचे अवमूल्यन झाले असून त्याबाबत सर्वांनीच विचार करायला हवा, असे परखड मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. तसेच शासनव्यवस्थेत भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात धाडण्यात येईल, अशी तंबीही त्यांनी दिली.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात फडणवीस यांनी मुंबईचा विकास, राज्यापुढील प्रश्न, राज्याच्या राजकारणाचा घसरलेला थर यावर भाष्य केले. ‘द इंडियन एक्स्प्रेस समूहा’चे कार्यकारी संचालक अनंत गोएंका आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘नॅशनल ओपिनियन एडिटर’ वंदिता मिश्रा यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचा पुढील मुख्यमंत्री म्हणून आपल्या नावाची घोषणा केली होती. महायुतीला बहुमत असतानाही उद्धव ठाकरे यांनी दगा दिला. त्यानंतर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली. आजच्या परिस्थितीत राजकारणात जिवंत राहण्यासाठी तडजोडी अपरिहार्य झाल्या आहेत. शरद पवार यांनीही १९७८ आणि १९९२ मध्ये अशा प्रकारे पक्ष फोडून, तडजोडी करून सरकार बनवले होते. राजकीय संधीसाधूपणा हा काही नवीन नाही. मात्र राजकारणात नीतिमूल्यांचे होणारे अवमूल्यन चिंताजनक आहे, अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत मुंबईची दाणादाण उडाल्यावरून सरकारवर टीका होत आहे. त्याबाबत फडणवीस म्हणाले, ‘पालिकेतील भ्रष्टाचार, कामातील गुणवत्तेचा अभाव याप्रमाणे अचानक झालेली अतिवृष्टी यातून सोमवारची परिस्थिती निर्माण झाली. वातावरणीय बदलामुळे यंदा लवकर अतिवृष्टी झाली. मुंबईत पाऊस थोडा उशिरा येत असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी आठ मोठी पंपिंग स्टेशन, नऊ मध्यम पंपिंग स्टेशन आणि ४५० पंप कार्यान्वित करण्यात येतात. मात्र, त्याआधीच अतिवृष्टी झाल्याने पाणी तुंबले.’ भूमिगत मेट्रोच्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाचे काम अपूर्णावस्थेत असून तेथे अपघात घडल्याचे सांगतानाच यापुढे त्याची पुनरावृत्ती होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुंबईतील नालेसफाईच्या घोटाळ्यांवर एखादा चित्रपट निघू शकेल. मात्र यापुढे हे सहन केले जाणार नाही. पालिकेतील नालेसफाई वा अन्य कामातील घोटाळेबाजांवर कारवाईची पोलिसांना मुभा देण्यात आली असून यात कोणी कितीही मोठा असला तरी घोटाळेबाजांना कारागृहाची हवा खावीच लागेल, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला. ‘महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचार होऊच नये, अशी आपली भूमिका आहे. मात्र, झालाच तर कारवाई केली जाईल,’ असे सांगतानाच ‘आपल्याला ओलांडून काम करण्याची हिंमत कोणी करणार नाही’ असेही ते म्हणाले.
‘एसी लोकल’चे दर कमी करण्याची मागणी
मुंबईतील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मेट्रो प्रकल्पांना प्राधान्य दिले जात असून येत्या चार वर्षांत सुमारे ३०० किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे उपलब्ध होईल. त्यानंतर ७० लाख प्रवाशी मेट्रोचा तर ९० लाख प्रवाशी उपनगरीय रेल्वेचा वापर करतील. वातानुकूलित उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या भाड्यांवरून मुंबईकरांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे वातानुकूलित गाड्यांचे भाडे साध्या गाड्यांप्रमाणेच ठेवण्याची विनंती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना केली असून त्यांनीही या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मेट्रोप्रमाणेत कमी भाड्यात उपनगरीय वातानुकूलित गाडीतूनही प्रवास करता येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
धारावी जगासाठी आदर्श ठरेल
धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातून आठ लाख झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन केले जाणार असून सुमारे १९ हजार उद्याोगांना धारावीतच उद्याोगांची संधी दिली जाणार आहे. भूमिगत मेट्रोने धारावी जोडली जाणार असून येत्या सात वर्षांत हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धारावी प्रकल्प हा जगासाठी आदर्श प्रारूप असेल, असा दावा त्यांनी केला. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील नैना प्रकल्पाच्या माध्यमातून नवे शहर वसविले जात असून तेथे ‘एज्युसिटी’मध्ये जगभरातील नामांकित १२ विद्यापीठांनी आपली केंद्रे सुरू करण्यास स्वारस्य दाखविल्याचेही ते म्हणाले.
६० हजार सरकारी कर्मचाऱ्यांना बढती
आपल्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात दळणवळण आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले होते. मात्र यावेळी प्रशासकीय सुधारणा आणि पारदर्शक, गतिमान कारभाराला प्राधान्य दिले असून गेल्या दोन वर्षांत झाले नाही तेवढे काम गेल्या शंभर दिवसांत प्रशासनाने केले आहे. आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम देण्यात आला असून या काळात ६० हजार सरकारी कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या बढत्या मार्गी लावणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच लवकरच सरकारच्या विविध १२०० सेवा व्हॉटसअपच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. लोकांनी सरकारी कार्यालयात न येता त्यांना घरपोच सेवा देण्याचा राज्य सरकारचा इरादा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.