लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : वसई-विरारला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणाऱ्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातील पहिला टप्पा जूनमध्येच पूर्ण झाला आहे. मात्र तरीही या प्रकल्पातून वसई-विरारकरांना पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मुख्यालयावर मोर्चा काढला होता. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील काही कामे शिल्लक असून पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरपासून वसई-विरारला पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले. वसई-विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरडीएने सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेतला आहे. एमएमआरडीएने कंत्राटदार एल ॲण्ड टीच्या माध्यमातून सुमारे १९७७.२९ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या कामाला २०१७ मध्ये सुरुवात केली. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर वसई-विरार परिसराला प्रतिदिन १८५ दशलक्ष लिटर, तर मीरा-भाईंदरला प्रतिदिन २१८ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पहिला टप्पा जूनमध्ये पूर्ण झाला. पहिल्या टप्प्याअंतर्गत प्रत्यक्ष पाणीपुरवठा करण्यासाठी वसई-विरार महानगरपालिकेने जलवाहिन्या टाकण्याचे कामही पूर्ण केले आहे. मात्र तरीही प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची वसई-विरारकारांना प्रतीक्षाच आहे. आणखी वाचा-एड्सच्या जनजागृतीसाठी ‘क्यूआर कोड’, मोबाइलवर मिळणार सहज माहिती पहिल्या टप्प्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. यासाठी त्यांच्याकडे वेळही मागण्यात येत आहे. पण अद्याप मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याचे पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पर्यायाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी वांद्रे येथील एमएमआरडीए मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त २ अश्विन मुदगल यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने पहिला टप्पा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी केली. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील काही कामे शिल्लक आहेत. ही कामे पूर्ण करून नवरात्रोत्सवापर्यंत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन मुदगल यांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती सुनील शिंदे यांनी दिली. तर एमएमआरडीएने हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला. आणखी वाचा-मुंबई: सल्ला शुल्क ८५ कोटी रुपयांवर; सल्लागाराच्या शुल्कात पाचव्यांदा सात कोटी रुपयांची वाढ म्हाडालाही पाणी पुरवठ्याची प्रतीक्षा म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींजमधील दहा हजार घरांच्या प्रकल्पात पिण्याच्या पाण्याची सोयच नाही. त्यामुळे म्हाडाच्या या घरांची विक्री होऊ शकलेली नाही. या प्रकल्पातील रहिवासी पाणी प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सूर्या प्रकल्पाचा पहिला टप्पा कधी कार्यान्वित होतो याकडे कोकण मंडळाचे लक्ष लागले आहे. आगामी सोडतीत बोळींज येथील दोन हजारांहून अधिक घरांची विक्री करण्यात येणार आहे. सूर्या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू झाला तरच या घरांची विक्री होऊ शकेल.