मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना राज्य सरकारने स्थानिक रहिवाशांचा विरोध डावलून मरिन ड्राईव्ह येथील विल्सन जिमखाना ‘जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन’च्या झोळीत टाकला. या संस्थेनेही एक पाऊल पुढे टाकत मैदानाचे ‘जैन जिमखाना’ असे नामकरण केले. तसेच त्यावर धार्मिक उपक्रमांना सुरुवात केल्याने दक्षिण मुंबईत मराठी-अमराठी भाषकांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.
दक्षिण मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या पाचपैकी एक मोठे खेळाचे मैदान ‘ख्रिश्चन रिफॉर्म युनायटेड पिपल्स असोसिएशन’ला १८३२ मध्ये भाडेकराराने देण्यात आले होते. दक्षिण मुंबईमधील प्रख्यात विल्सन महाविद्यालयाशी संबंधित असलेले सुमारे १०२५७.८८ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले हे मैदान ‘विल्सन जिमखाना’ म्हणून प्रसिद्ध होते. या मैदानावर फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, बॉक्सिंग, जिमनॅस्टिक, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ आदी खेळ खेळले जात होते. या जिमखान्याने अनेक क्रीडापडू घडवले.
गिरगाव, कुंभारवाडा, ताडदेव, ग्रॅन्ट रोड, ‘सीएसएमटी’ आणि आसपासच्या परिसरातील मुले ‘विल्सन जिमखाना मैदानावर नित्यनियमाने खेळण्यासाठी, तसेच सकाळी व्यायाम करण्यासाठी येत होते. कालौघात येथील छोटेखानी इमारतीला आग लागली आणि त्यानंतर हे मैदान संबंधितांकडून दुर्लक्षित झाले. नंतर भाडेपट्ट्याचा कालावधीही संपुष्टात आला. ‘ख्रिश्चन रिफॉर्म युनायटेड पिपल्स असोसिएशन’ने भाडेकरार करण्यासाठी शासन दरबारी अर्जही दाखल केला. मात्र भाडेकराराला मुदतवाढ वा नवा भाडेकरार करण्यात आला नाही.दरम्यान, ‘जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन’ने मैदानावरील इमारतीच्या दर्शनी भागात ‘जैन जिमखाना’ असा फलक झळकविला आहे. तसेच भूखंडावर कोणीही अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देणारा फलकही तेथे लावला आहे. मैदानात खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले असून जैन समाजातील मुनी मंडळींचे काही उपक्रम तेथे सुरू झाले आहेत. या प्रकारामुळे दक्षिण मुंबईतील मराठी भाषकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भूखंड ३० वर्षांसाठी बहाल
– नवीन भाडेकरार न करता, जिल्हाधिकाऱ्यांनी २०२३ मध्ये विल्सन जिमखान्याची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ११ मार्च २०२४ रोजी भूलेश्वर महसूल विभागातील हा भूखंड ताब्यात घेण्यात आला.
– दरम्यानच्या काळात विल्सन जिमखान्याचा भूखंड जैन अल्पसंख्याक समाजाच्या जिमखान्यासाठी ‘जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन’ला देण्याबाबतच्या हालचालींना वेग आला.
– अखेर महसूल व वन विभागाने हा भूखंड २६ मार्च २०२४ रोजी ‘जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन’ला काही अटी-शर्तींच्या अधीन राहून ३० वर्षांसाठी बहाल केला. ११ जुलै २०२४ रोजी जिमखान्याच्या भूखंडाचा ताबा देण्यात आला.
माजी विद्यार्थी आक्रमक
जिमखान्याच्या मंजूर केलेल्या जमिनीचा नियोजित वापर पुढील तीन वर्षांमध्ये सुरू करणे आवश्यक असल्याची अट जिमखान्याचा ताबा देताना घालण्यात आली होती. मात्र याबाबत कुणकुण लागताच विल्सन महाविद्यालयातील माजी विद्यार्थी, तसेच या मैदानावर खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे मैदानात ‘जैसे थे’ स्थिती होती. परंतु एका विशिष्ट समाजासाठी हा भूखंड दिल्याने मुलांनी खेळण्यासाठी जायचे कुठे, असा प्रश्न या परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.
