मुंबई : सप्टेंबरमध्ये अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे हिवताप व डेंग्यूच्या डासांसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने या महिन्यामध्ये डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत मागील चार महिन्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २५ सप्टेंबरपर्यंत मुंबईमध्ये हिवतापाचे १०६८, तर डेंग्यूचे १०३१ इतके रुग्ण सापडले आहेत. जूनपासूची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईभोवती हिवताप व डेंग्यूचा विळखा अधिकच घट्ट होताना दिसत आहे.
मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे हिवतापाची लागण होण्यास कारणीभूत असलेल्या ॲनोफिलीस आणि डेंग्यूसाठी कारणीभूत असलेल्या एडिस डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यांच्या तुलनेमध्ये सप्टेंबरमध्ये हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ झाल्याचे मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या जलजन्य आजारांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा – मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्य रेल्वेवर विशेष लोकल धावणार
हेही वाचा – मुंबई : वंदे भारतमधील प्रवाशांनी घेतला मोदकाचा आस्वाद
हिवतापाचे जूनमध्ये ६७६, जुलैमध्ये ७२१, ऑगस्टमध्ये १०८० तर २५ सप्टेंबरपर्यंत १०६८ इतके रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे डेंग्यूचे जूनमध्ये ३५३, जुलैमध्ये ६८५, ऑगस्टमध्ये ९९९ आणि सप्टेंबरमध्ये १०३१ इतके रुग्ण सापडले आहेत. मुंबईमध्ये हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना लेप्टो, हॅपेटायटीस, चिकनगुनिया आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. त्याचप्रमाणे जून व जुलैमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये गॅस्ट्रोचे अवघे ४४० रुग्ण सापडले आहेत. मागील चार महिन्यांतील ही सर्वाधिक कमी रुग्णसंख्या आहे.