केंद्र सरकारकडून ४५ टक्के पुरवठा; साठा केवळ एक दिवसाचा

मुंबई : केंद्र सरकारच्या वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडसह (वेकोली) अन्य कोळसा कंपन्यांकडून महाराष्ट्राच्या वीज प्रकल्पांना के वळ ४५ टक्के च कोळसा पुरवठा होत असल्याने महानिर्मितीच्या वीजप्रकल्पांवर संकट उभे ठाकले आहे. वीज निर्मितीसाठी रोज किमान १ लाख ४६ हजार ५५० मेट्रिक टन कोळसा आवश्यक असताना महानिर्मितीकडे अवघा १ लाख ६३ हजार ५५० मेट्रिक टन कोळसा सध्या उपलब्ध आहे. एक दिवस पुरेलच एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे.

 १ ऑगस्टला महाजनकोकडे  १४ लाख मेट्रिक टन एवढा साठा उपलब्ध होता. परंतु कोळसा कंपन्यांकडून गेल्या दीड महिन्यात कमी पुरवठा झाल्याने जेमतेम एक दिवस पुरेल एवढा म्हणजे १ लाख ६३ हजार ८९५ मेट्रिक टन एवढाच साठा उपलब्ध आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी या कोळसा टंचाईबाबत बैठक घेतली. वीज निर्मिती कंपन्यांना नियमित कोळसा मिळावा म्हणून केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आंतर-मंत्रालयीन गटाच्या बैठकीत ऑगस्ट महिन्यापासून ठरल्याप्रमाणे कोळसा मिळत नसल्याची तक्रार महानिर्मितीने वारंवार केली. मात्र या गटाच्या बैठकीत कोळसा पुरवठ्याचे के वळ आश्वासन मिळाले. प्रत्यक्षात कोळसा पुरवठ्यात अपेक्षित सुधारणा झाली नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. कोळसा पुरवठा होत नसल्याबाबत बैठकीतूनच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना दूरध्वनी केला.

महाराष्ट्राच्या प्रकल्पांना कमी कोळसा पुरवला जात असल्याकडे लक्ष वेधत नियमित व योग्य प्रमाणात कोळसा पुरविण्याची विनंती राऊत यांनी केली. तसेच वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या राज्यातील खाणीतला कोळसा इतर राज्याच्या तुलनेने महागड्या दराने महानिर्मितीला विकत असल्याची तक्रार करत तो रास्त दराने देण्याची विनंतीही त्यांनी जोशी यांना केली.

बाहेरून खरेदी…भविष्यात कोळसा टंचाई होऊ नये यासाठी कोळसा मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा करून अधिकचा कोळसा साठविण्यासाठी योग्य तरतूद करण्याची सूचना ऊर्जामंत्री राऊत यांनी अधिकाऱ्यांना के ली. कोळसा कमी मिळाल्याने राज्याच्या प्रकल्पांकडून वीजनिर्मिती कमी झाल्याने खुल्या बाजारातून वीज विकत घ्यावी लागत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कोळसा खरेदीसाठी महावितरणने अधिकची तरतूद करून ती रक्कम महानिर्मितीला देण्याची सूचनाही त्यांनी के ली.

गंभीर परिस्थिती… गेल्या तीन महिन्यांपासून केंद्र सरकारकडून महानिर्मितीसाठी अपेक्षित साठ्याच्या सरासरी ५० टक्केच कोळसा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पुरवठ्याच्या केवळ ५२.६४ टक्केच कोळसा पुरवठा करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात १९ तारखेपर्यंत अपेक्षित पुरवठ्याच्या केवळ ४५.१६ टक्केच कोळसा पुरवठा करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात वेकोलीकडून २२१६ मेट्रिक टन कोळसा मिळणे अपेक्षित असताना केवळ ८७३ मेट्रिक टन कोळसा म्हणजे केवळ ४५.१६ टक्के कोळसा प्राप्त झाला.