मुंबई: केंद्रीय कृषी कायदे संसदेत रद्द करून हमीभावाचा कायदा केल्याशिवाय शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही, त्यासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संघर्षांला काँग्रेसची साथ राहील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी जाहीर केले.

संयुक्त शेतकरी, कामगार मोर्चाच्या वतीने आयोजित  पत्रकार परिषदेत पटोले यांनी पक्षाची भूमिका मांडली. या वेळी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी, काँग्रसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, तसेच जनता दल, समाजवादी पक्ष व इतर समविचारी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  केंद्र सरकारने  कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना संपवण्याचे षड्यंत्र आखले होते, त्याला विरोध करत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले. शेवटी कायदे मागे घेत असल्याची घोषणा सरकारला करावी लागली. परंतु जोपर्यंत संसदेत हे कायदे रद्द करून हमीभावाचा कायदा केला जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही, असे पटोले म्हणाले.

मुंबईत २८ तारखेला संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने  शेतकरी, कामगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शेतकरी  नेते राकेश टिकैत, डॉ. दर्शन पाल, हनन मुल्ला आदी नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.