विनातिकीट प्रवास करताना पकडलेल्या एका मुलीच्या नातेवाईकांनी रेल्वे प्रशासनाविरोधात चेंबूर स्थानकात धुडगूस घालण्याची घटना गुरुवारी घडली. या मुलीकडे दंडाची रक्कम मागितली असता तिने आपल्या आईवडिलांना बोलावले. त्यानंतर आपल्या मुलीची अंगठी तिकीट तपासनीसांनी चोरली, मुलीला खोलीत डांबून ठेवले, असे आरोप करत तिच्या पालकांनी आणि जमावाने स्टेशन अधीक्षकांच्या खोलीत जात खुच्र्याची आदळआपट केली.
सानपाडा येथे राहणाऱ्या मनिषा गुप्ता या १६ वर्षीय मुलीला तीन महिला तिकीट तपासनीसांनी चेंबूर येथे तिकीट दाखवण्यास सांगितले. तिच्याकडे तिकीट नसल्याचे आढळल्यावर त्यांनी तिला दंड भरण्यास सांगितला. मात्र दंडाइतकी रक्कम जवळ नसल्याने आपल्या आईला दूरध्वनी करून बोलावते, असे तिने सांगितले. त्या वेळी या तिकीट तपासनीसांनी या मुलीला जवळच असलेल्या लोहमार्ग पोलिसांसाठीच्या खोलीत बसवून ठेवले. दुपारी दीडच्या सुमारास या मुलीचे पालक चेंबूर स्थानकात आले. आल्यानंतर त्यांनी मुलीला खोलीत डांबून ठेवले असे सांगत आरडाओरडा सुरू केला. या मुलीकडे १३० रुपये होते, मग तेवढा दंड घेऊन सोडून द्यायचे, असे तिच्या वडिलांचे म्हणणे होते. त्यावर रक्कम दिल्याशिवाय सोडता येणार नाही, असे तिकीट तपासनीसांनी सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने स्टेशन अधीक्षकांच्या खोलीत घुसून आदळआपट केली.

 

हस्तिदंत विकणारी टोळी अटकेत
मुंबई : मुंबईतील खेतवाडी बॅक रोड येथील सायरस हॉटेल येथे सुमारे अडीच किलो वजनाचे व १ कोटी रुपयांचे हस्तिदंत पोलिसांनी छापा टाकून हस्तगत केले आहेत. हस्तिदंत विक्रीसाठी एक टोळी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी हा छापा टाकला असून या प्रकरणी बुधवारी ४ इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे. वन्यजीव निरीक्षकांसह पोलिसांनी ही कारवाई केली.