मुंबई : आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणातील पंचाने अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ‘एनसीबी’वरील लाचखोरीच्या आरोपांमुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू  झाले आहेत. एनसीबीने मात्र आरोप फेटाळले आहेत.      

आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान यांच्याकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील आठ कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे. प्रभाकर यांनी एक चित्रफीत प्रसारित केली आहे. तसेच प्रतिज्ञापत्रही समाज माध्यमांवर प्रसारीत झाले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक माहिती उघड केली आहे.

२५ कोटींचा बॉम्ब टाका..

या प्रकणातील दुसरे पंच के. पी. गोसावी आणि सॅम डिसूझा यांचे दूरध्वनीवरील संभाषण मी ऐकले होते. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत व्यवहार अंतिम करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असे संभाषण दोघांमध्ये झाल्याचा प्रभाकर यांचा दावा आहे. आपण के.पी. गोसावी यांचे अंगरक्षक असल्याचा दावाही प्रभाकर यांनी केला आहे. क्रुझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा दादलानी आणि के. पी. गोसावी तसेच सॅम यांना निळ्या रंगाच्या मर्सिडीजमध्ये पाहिले होते. या तिघांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली होती, असा दावाही प्रभाकर यांनी केला आहे.

कोऱ्या कागदांवर सह्य़ा

गोसावीने मला दूरध्वनी केला आणि पंच राहण्यास सांगितले. ‘एनसीबी’ने १० कोऱ्या कागदांवर माझ्या सह्य़ा घेतल्या. तसेच मी गोसावींना ५० लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी गोसावीने मला फोन केला होता. तसेच २ ऑक्टोबरला साडेसात वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आले. गोसावीने मला काही छायाचित्रेही पाठवली होती. त्यातील व्यक्ती ग्रीनगेटवर आल्यानंतर कळवण्यास सांगितले होते, असा दावा प्रभाकर यांनी केला आहे. 

गोसावी आणि सॅम एका गाडीत आणि आम्ही दुसऱ्या गाडीतून आलो आणि लोअर परेलला एका पुलाखाली थांबलो. तेथे आमच्या मागे निळ्या रंगाची मर्सिडीज आली. त्या गाडीत शाहरूख खानची व्यवस्थापक बसली होती. तिघांमध्ये बैठक झाली. त्यात काय झाले मला कळले नाही. गाडीतून त्यांनी दूरध्वनी केला. त्यावेळी २५चा बॉम्ब टाक. १८ पर्यंत अंतिम करू. आठ वानखेडे साहेबांना जातील, १० आपण वाटून घेऊ, असे त्यांचे संभाषण झाल्याचे मी ऐकले, असे प्रभाकरने म्हटले आहे. त्यानंतर मंत्रालयासमोर जाऊन आम्ही उभे राहिलो. नंतर, पूजा फोन नही उठा रही है असे म्हणून सॅमचा फोन आला. जाऊदे आम्ही घरी जातो असे गोसावी यांनी म्हटल्यानंतर आम्ही तेथून निघालो, असा दावा प्रभाकरने चित्रफीतीत केला आहे.

गोसावीने प्रभाकरला दूरध्वनी करून महालक्ष्मीला जाण्यास सांगितले. तिथे एक गाडी येईल, त्यामधून तुला ५० लाख रुपये घ्यायचे आहेत, असे सांगितले. पांढऱ्या रंगाच्या त्या गाडीतून पैसे घेऊन घरी गेलो. तिथे गोसावी यांची पत्नी होती. मी बॅग दिली. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता मला वाशी पुलाकडे पुन्हा बोलावले. इनॉर्बिट मॉलजवळ पुन्हा माझ्या हातात पैशांची बॅग दिली. चर्चगेटला जाऊन पुन्हा सॅम यांना ते पैसे दे, असे ते म्हणाले. बॅगेत ३८ लाख रुपयेच होते. मला त्याबाबत काहीही माहीत नसल्याने मी गोसावींशी बोलून घ्या, असे म्हणालो. बाकीचे १२ लाख दोन दिवसांत देतो, असे गोसावींनी सांगितल्याचेही प्रभाकरने चित्रफीतीत म्हटले आहे.

या प्रकरणानंतर प्रभाकर यांच्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी दूरध्वनी आला. तिला पोलिसांचे चौकशीसाठी दूरध्वनी आले होते.  माझ्या कुटुंबाला काही झाले तर मी कुणासाठी जगायचे. समीर वानखेडे यांची मला भीती वाटत असल्यामुळेच मी हे सगळे तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे, असल्याचे प्रभाकरने चित्रफीतीत शेवटी म्हटले आहे. 

वानखेडेंनी आरोप फेटाळले

* प्रभाकर साईल यांचे प्रतिज्ञापत्र समाज माध्यमांवरून आपल्या निदर्शनास आल्याचे ‘एनसीबी’चे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी सांगितले.

* ते या प्रकरणात साक्षीदार असल्यामुळे त्यांनी हे प्रतिज्ञापत्र समाज माध्यमांऐवजी न्यायालयात सादर करावे.

* तसेच प्रतिज्ञापत्रात त्यांनी एका व्यक्ती विरोधात आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

* काही आरोप दक्षते (पैसे मागण्याच्या) संदर्भातील आहेत. त्यामुळे आपण हे प्रतिज्ञापत्र कार्यवाहीसाठी ‘एनसीबी’च्या महासंचालकांना पाठवत असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि बॉलिवूडमधील मान्यवरांना लक्ष्य करण्याचा, त्याचबरोबर महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कट रचण्यात आला आहे. एनसीबीच्या कारवाया सुद्धा याच कटाचा भाग असल्याची शंका निर्माण झाली आहे.

नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस</strong>

अंमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याची काहींनी सुपारी घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच केलेले प्रतिपादन खरे असल्याचेच पंच साक्षीदाराच्या आरोपातून सिद्ध झाले आहे. चित्रपटसृष्टीत दहशत निर्माण करण्याचा एनसीबीचा डाव आहे.

– संजय राऊत, खासदार, शिवसेना

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे श्रीमंतांकडून पैसे उकळण्यासाठी खोटी प्रकरणे दाखल करीत असल्याचे पंचाच्या आरोपातून उघड झाले आहे. त्यामुळे विशेष चौकशी पथक नेमून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी. – नवाब मलिक</strong>, अल्पसंख्यांक मंत्री