मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत समाज माध्यमावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या महिलेवर वेगवेगळे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. समाजमाध्यमावर सक्रिय असलेल्या अमृता फडणवीस वेगवेगळ्या विषयावर भाष्य करतात. त्यामुळे त्यांच्या पोस्टला खूप प्रतिसाद मिळतो. त्यांनी समाजमाध्यमांवर टाकलेल्या एका पोस्टवर ७ सप्टेंबर रोजी एका महिलेने चार वेगवेगळे प्रतिसाद दिले. त्यात अपशब्द, अपमानित करणारी भाषा वापरण्यात आली होती. याप्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीनंतर मुंबई सायबर गुन्हे शाखेने स्मृती पांचाळ या महिलेला ठाण्यातून अटक करून माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर महिलेचा मोबाइल जप्त केला आहे.

हेही वाचा <<< सहारा प्रमुख सुब्रत रॉय यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट

सायबर पोलिसांनी केलेल्या चौकशीत महिलेने आपली खरी ओळख लपवण्यासाठी ‘गणेश कपूर’ नावाचे बनावट फेसबुक खाते तयार केले होते. त्या खात्याचा वापर करून महिलेने अमृता फडणवीस यांच्या पोस्टवर आक्षेपार्ह शब्दात प्रतिसाद दिला होता. आरोपी महिलेला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.