मुंबई : प्रजासत्ताकदिनी मंत्रालयासमोर आत्मदहनासाठी आलेल्या शेतकरी महिलेला पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने ताब्यात घेतले. यामुळे मोठा अनर्थ टळला. या महिलेच्या मालकीचा सोयाबीन व मका परस्पर विक्री करून त्यांची फसवणूक झाली असून त्याप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी आपण हा प्रकार केल्याचे त्यांनी चौकशी सांगितले.
वंदना पाटील असे या शेतकरी महिलेचे नाव असून त्या जळगाव, जामनेर येथील नेरी गावातील रहिवासी आहेत. वंदना पाटील यांच्या पतीने शेतात सोयाबीनचे पीक घेतले होते. सोयाबीन व मक्याची परस्पर विक्री करून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबईच्या मंत्रालयासमोरच आत्महदन करण्यासाठी त्या आल्या होत्या. यापूर्वी त्यांनी पोलिसांना अर्ज केला होता. त्यात त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर त्या रॉकेल घेऊन मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आल्या. परंतु पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पीडित महिलेविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाटील यांना सीआरपीसी कलम ४१(अ)(१) अंतर्गत नोटीस देऊन पोलिसांनी सोडले.