Woman shouting at Girish Mahajan in Worli Video: लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने मुंबईतील वरळी डोम येथे ‘जन आक्रोश महिला संमेलन’ आयोजित केले होते. मात्र, या आंदोलनामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांनाच खडेबोल सुनावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नेमकी घटना काय?

भाजपाच्या या मोर्चामुळे वरळी आणि परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे एका महिलेचा संयम सुटला. तिने थेट मोर्चाच्या ठिकाणी जाऊन गोंधळ घातला आणि समोर असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. “विरोध करायचा असेल तर मैदानात करा, लोकांना ट्रॅफिकमध्ये का अडकवता?” असा सवाल करत तिने आपला संताप व्यक्त केला. यावेळी पोलीस आणि महिला आंदोलकांमध्येही शाब्दिक चकमक उडाली.

व्हिडीओ व्हायरल

वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांनाच खडेबोल सुनावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रोहित पवारांची टीका

या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “केवळ ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ला खूष करण्यासाठी लोकांना तीन-तीन तास वेठीस धरणे चुकीचे आहे. आंदोलनाचे कारण खोटे असेल तर लोक अशीच फजिती करतात,” असे ट्विट पवारांनी केले आहे. तसेच, संबंधित महिलेवर कारवाई न करता सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

हर्षवर्धन सपकाळ यांनी यांच्याकडून टीका

“महिला आरक्षणाच्या नावाखाली खोटे नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा या धाडसी भगिनीने उघडा पाडला आहे. महिलांचा केवळ राजकीय साधन म्हणून वापर करणाऱ्या भाजपचा संविधान बदलण्याचा डाव ‘इंडिया’ आघाडीने याआधीच हाणून पाडला होता. आज केवळ एका मंत्र्याला सुनावले आहे, पण येणाऱ्या काळात देशातील महिला भाजपला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपा भगाओ, देश बचाओ!”, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

सध्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांना देखील यामुळे टीकेची आयती संधी मिळाली आहे.