पतीच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू

मुंब्रा येथील कौसा भागात शुक्रवारी रात्री घरगुती वादातून पतीने पत्नी आणि सासूवर चाकूने हल्ला करत स्वत:च्या एक वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

मुंब्रा येथील कौसा भागात शुक्रवारी रात्री घरगुती वादातून पतीने पत्नी आणि सासूवर चाकूने हल्ला करत स्वत:च्या एक वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेत पत्नीचा मृत्यू तर सासू गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पती वसीम शेख (२२) आणि त्याचा मित्र सलीम कादरी (२३) या दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना ठाणे न्यायालयाने ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मुंब्रा भागात राहणाऱ्या वसीम शेखचे पत्नी अफरीन हिच्याशी भांडण झाले होते. त्यामुळे अफरीन कौसा येथील रशीद कंपाऊंडमध्ये आईच्या घरी राहत होती. तिच्यासोबत त्यांची एक वर्षीय मुलगी राहत होती. त्या मुलीला भेटण्यासाठी वसीम त्यांच्या घरी येत असे. शुक्रवारी रात्री वसीम मुलीला भेटण्यासाठी घरी गेला होता. त्या वेळी त्याच्यासोबत त्याचा मित्र सलीम होता. या दोघांनी त्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला असता, अफरीनने त्यांना अडविले. त्यामुळे संतापलेल्या वसीमने अफरीनवर चाकूने हल्ला चढविला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तसेच अफरीनला वाचविण्यासाठी तिची आई गुलाबजाम फरुद्दीन शेख (३७) या आल्या असता, त्यांच्यावरही वसीमने चाकूने हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक उषा सुराडकर यांनी दिली.   

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Woman dies in husbands attack