मुंबई: मोबाइल चोराला पकडण्यासाठी गेलेली महिला प्रवासी लोकलमधून पडल्याचा प्रकार घडला आहे. त्यात महिला गंभीर जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. माहीम स्थानकाजवळ मंगळवारी हा अपघात घडला होता. या घटनेतील जखमी झालेल्या प्रियंका खडके या बदलापूर येथील रहिवासी आहेत. त्या सांताक्रुझ येथील शिधा वाटप कार्यालयात कार्यरत आहेत. माहीम स्थानकाच्या फलाट क्रमांक दोन येथे हा अपघात झाला. या महिलेचा मोबाइल रमजान ऊर्फ यासिनुद्दीन खान यांनी चोरला. त्यावेळी चोराला अडवण्याच्या प्रयत्नात त्या लोकलमधून पडल्या. इतर प्रवाशांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. खडके यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.