महिलेच्या गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव वेगाने जाणाऱ्या एका महिलेच्या होंडा सिविक गाडीने एका रिक्षा आणि मोटारसायकलीला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार ठार झाला तर रिक्षाचालकासह तीन प्रवासी जखमी झाले.

भरधाव वेगाने जाणाऱ्या एका महिलेच्या होंडा सिविक गाडीने एका रिक्षा आणि मोटारसायकलीला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार ठार झाला तर रिक्षाचालकासह तीन प्रवासी जखमी झाले. कांदिवलीच्या लिंक रोड येथील महावीरनगर येथे शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला.
चारकोप येथे राहणारी साक्षी पारेख (३२) ही महिला सकाळी आपल्या घरातून होंडा सिविक गाडीने अंधेरीच्या दिशेने जात होती. घरातून निघताच भभरधाव वेगाने जात असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास कांदिवली लिंक रोड येथील महावीरनगर येथे तिच्या गाडीचे नियंत्रण सुटले. सुरुवातीला तिने एका मोटारसायकलला आणि नंतर रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक दिलीप सोनी, प्रवासी एजाज सिद्दिकी आणि लोकेश यादव जखमी झाले. तर मोटारसायकलस्वाराचे नावही दिलीप सोनीच (३५)असून तो गंभीर जखमी झाला. सर्व जखमींना भगवती रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र मोटारसायकलस्वार दिलीप सोनी याचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी दिली. साक्षी हिने मद्यपान केलेले नव्हते, असे तपासणीत निष्पन्न झाले आहे. साक्षी चारकोप येथील एका व्यावसायिकाची पत्नी असून गृहिणी आहे. ब्रेक दाबण्याऐवजी चुकून अ‍ॅक्सिलरेटर दाबले गेल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे साक्षीने पोलिसांना सांगितले. तिला निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केल्याचे, चारकोप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब घाडगे यांनी सांगितले. मयत दिलीप सोनी हा चारकोप येथे राहणारा असून त्याचे एसी दुरुस्तीचे दुकान आहे.
अभिनेत्री असल्याचा बनाव
अपघातानंतर लोकांची गर्दी जमली. त्यामुळे सुटका करण्यासाठी साक्षीने आपण अभिनेत्री असल्याचा बनाव केला आणि शूटिंगला उशीर होत असल्याने गाडी वेगात नेत होते, अशी सारवासारव केली. मानेवर टॅटू, आणि मॉडेल्ससारखा पेहराव असल्याने ती अभिनेत्री असल्याचे बघ्यांना वाटले आणि प्रसारमाध्यमातही दिवसभर ‘अभिनेत्रीच्या गाडीने अपघात केल्याच्या’ बातम्या प्रसारित होत होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Woman hit a bike rider killed