नोटाबंदीनंतर आपण सगळेच ऑनलाईन व्यवहारांना सरावलो असलो तरी ऑनलाईन सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या देशात फाऱशी जागृती झालेली नाहीये. त्यामुळे येत्या काळात मोठा प्रश्न तयार होण्याची शक्यता आहे.

मुंबईत घडलेल्या एका घटनेत पुरेशी काळजी न घेतल्याने एका तरूणीला ४० हजाराचा फटका बसला आहे.
या तरूणीने एका वेबसाईटवरून काही खरेदी केली होती. ती वस्तू तिला न मिळाल्याने तिने त्या वेबसाईटला तिचे पैसे तिला परत करण्याविषयी ई-मेल केली होती. ही ई-मेल पाठवल्यानंतर तिला ‘कस्टमर केअर’चा फोन आला. आपण त्या वेबसाईटचे प्रतिनिधी असल्याची बतावणी त्या माणसाने केली. त्यानंतर त्या माणसाने तिचा डेबिट कार्ड नंबर आणि ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्ड विचारला. या तरूणीने तो दिलाही आणि त्यानंतर तिच्या बँक अकाऊंटमधले पैसे अचानक तिच्या ई- वॉलेटमध्ये जमा झाले. आणि त्यानंतर हे पैसे वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये जमा व्हायला लागले. या सगळ्या प्रकारातून नंतर या हॅकर्सनी ४०,००० रूपये या तरूणीच्या अकाऊंटमधून लंपास करत वेगवेगळ्या बँक अकाऊंटस् मध्ये भरले. ही तरूणी पोलिसांकडे गेली खरी. पण तिची फसवणूक झाली ती झालीच. ही बहुतांश बँक अकाऊंट्स बिहारमधल्या पाटणामध्ये ट्रेस झाली

या सगळ्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना काही किमान खबरदारी घेणं आवश्यक झालं आहे.

  • तुमचा  डेबिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही नंबर (कार्डाच्या मागे असणारे तीन आकडे) कोणालाही सांगू नका
  • ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्ड गुप्त ठेवा.
  • ई-वाॅलेटचा वापर अतिशय काळजीपूर्वक करा
  • नेटबँकिंगचा पासवर्ड थोडासा क्लिष्ट ठेवा ज्यायोगे हॅकर्सना तो सहजी ओळखता येणार नाही