मुंबई: पतीला भेटून घरी परतत असलेल्या एका वैमानिक महिलेचा खासगी टॅक्सीत तिघांनी विनयभंग केल्याची घटना गुरुवारी रात्री मुंबईत घडली आहे. याप्रकरणी महिलेने केलेल्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.
पीडित २८ वर्षीय महिला एका खासगी विमान कंपनीत वैमानिक असून त्यांचे पती नौदलात अधिकारी आहेत. ते कुलाबा परिसरात काम करतात. त्या गुरुवारी रात्री पतीला भेटण्यासाठी कुलाबा परिसरात गेल्या होत्या. हॉटेलमध्ये रात्री १० च्या सुमारास जेवण केल्यानंतर त्या खासगी टॅक्सीने पूर्व उपनगरातील घरी जाण्यास निघाल्या. मात्र काही अंतर पुढे जाताच टॅक्सीचालकाने एका ठिकाणी गाडी थांबवली.
यावेळी या गाडीत आणखी दोघेजण बसले. यापैकी मागे बसलेल्या एका आरोपीने महिलेला अश्लील स्पर्श करण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्या आरोपीने महिलेला धमकावले. मात्र काही अंतरावरच पोलीस नाकाबंदीसाठी तैनात होते. पोलीस दिसताच त्या दोघांनी तत्काळ गाडीतून उतरून पळ काढला. त्यानंतर चालकाने महिलेला पूर्व उपनगरात सोडले आणि तोही पसार झाला.
पीडित महिलेला मुंबई शहराबाबत जास्त माहिती नसल्याने तिने तत्काळ पतीला फोन केला. त्यानंतर शुक्रवारी पती-पत्नी भेटले असता महिलेने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. दोघांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.