मुंबई : दादर पूर्व येथील नायगाव परिसरातून अपहरण झालेल्या आठ वर्षांच्या मुलाचा शोध घेण्यात भोईवाडा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी २४ तासांमध्ये आरोपीच्या तावडीतून मुलाची सुटका केली असून त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी तक्रारदार महिलेच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली. तक्रारदार स्वीटी कीर्तिकुडे नायगाव येथील गोिवदराव कुडे मार्ग येथील फुटपाथवर राहतात. शुक्रवारी रात्री आरोपी विजय विक्रम अहिरे (२६) याने कीर्तिकुडे यांच्या आठ वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. मुलगा खेळायला गेला होता. पण बराच वेळ परत न आल्याने आईने त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र मुलगा कुठेच सापडला नाही. त्यामुळे अखेर तिने भोईवाडा पोलिसांकडे माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ मुलाच्या शोधासाठी तीन पथके तयार केली. त्या वेळी आरोपी विजयनेच मुलाचे अपहरण करून नेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण विशेष काहीच माहिती मिळाली नाही. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीचे नातेवाईक व मित्रांची माहिती मिळवली. त्यानंतर पुण्यातील हडपसर व उस्मानाबाद येथील ईटगाव येथे दोन पथके शोधमोहिमेसाठी पाठवण्यात आली. एका पथकामार्फत मुंबईमध्ये लाल डोंगर, चेंबूर, माहुल गाव आंबापाडा, परेल, पारधीवाडा, शिवडी इत्यादी ठिकाणी शोध घेण्यात आला. शिवडी पूर्व येथील पारधीवाडा येथून आरोपी व मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपीला अटक करून मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. तक्रारदार महिला व आरोपी विजय गेल्या दीड वर्षांपासून एकत्र राहत होते. अपहरण झालेला मुलगा पहिल्या पतीचा आहे. तक्रारदार महिला व आरोपीमध्ये भांडण झाले होते. त्याच्या रागातून त्याने मुलाचे अपहरण केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीतेंद्र पवार यांनी सांगितले.