घटस्फोटाची मागणी न्यायालयाकडून मान्य

मित्रांसमोर पत्नीने आपल्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केल्याचा दावा पतीने साक्षीपुराव्यांतून सिद्ध केल्याने याच मुद्दय़ाच्या आधारे उच्च न्यायालयाने त्याची काडीमोडाची केलेली मागणी मान्य केली आहे. सगळ्यांसमोर पतीच्या वा पत्नीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आणि त्यानंतर त्या आरोपांत तथ्य असल्याचेही सिद्ध करता न येणे हासुद्धा घटस्फोटासाठी आधार असू शकतो, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले आहे. शिवाय पती वा पत्नीविरोधात खोटे, असभ्य आणि बदनामीकारक आरोप करणे ही क्रूरताच आहे, असा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे.

मित्रांसमोर पत्नी आपली बदनामी करत असल्याचा दावा करत मुंबईस्थित एका पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली होती. १९९४ मध्ये या दोघांचा विवाह झाला होता. परंतु लग्नाच्या चार वर्षांनंतरच त्यांच्यात विविध कारणास्तव खटके उडू लागले होते. आपण बाईलवेडा आणि मद्यपी असल्याच्या कागाळ्या पत्नी सगळ्यांसमोर करून आपली बदनामी करते. शिवाय चारित्र्यहीन लोकांना आपण घर भाडय़ाने दिले आहे आणि तेथे होणाऱ्या बेकायदा कारवायांमध्ये आपला सहभाग असल्याचा आरोपही तिने केला आहे; परंतु तिने केलेले हे आरोप तथ्यहीन आहेत, असा दावा करत ज्या पाच मित्रांसमोर पत्नीने त्याच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले, त्यांची नावे त्याने न्यायालयात सादर केली. त्यातील एकाची कुटुंब न्यायालयासमोर साक्षही नोंदवण्यात आली. त्यात त्याने पतीची मालमत्ता, त्याच्या व त्याच्याकडून पैसे मिळत नसल्याने वैतागून पत्नीने हे आरोप केल्याचे न्यायालयाला सांगितले होते. तिने केलेले अन्य आरोपही बिनबुडाचे आहेत. एवढेच नव्हे, तर तिचे वर्तन लक्षात घेता त्या दोघांचा संसार सुखाचा असेल असे वाटत नाही आणि तिच्या या वागणुकीमुळे त्याचे जीवन उद्ध्वस्त झाले असल्याचेही साक्षीदाराने कुटुंब न्यायालयाला सांगितले होते.

बदनामी ही क्रूरताच

न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने या सीक्षादाराची साक्ष ग्राह्य़ मानताना केवळ या एकाच आरोपाच्या आधारे पतीने केलेली घटस्फोटाची मागणी मान्य केली. पती वा पत्नीविरोधात खोटे, असभ्य आणि बदनामीकारक आरोप करणे ही क्रूरताच आहे, असा निर्वाळा देताना याप्रकरणीही साक्षीदाराच्या साक्षीवरून पत्नीने पतीच्या मित्रांसमोर त्याच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. पत्नीच्या वकिलांनाही उलटतपासणीच्या वेळेस हा आरोप तथ्यहीन असल्याचे सिद्ध करता आले नाही. पत्नीही हा आरोप तथ्यहीन असल्याचे सिद्ध करू शकली नाही. त्यामुळेच तिने पतीची त्याच्या मित्रासमोर केलेली बदनामी ही क्रूरताच आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.